करमाळा_चौफेर
माजी आमदार संजयमामा शिंदे गटातील महत्व कमी झाल्याने भरत अवताडे यांनी मुझे गिनो म्हणत राजकीय स्टंटबाजी सुरु केली असुन चालू आवर्तनाचे त्यांना काही देणेघेणे नाही असा मार्मिक टोला आमदार नारायण आबा पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी लगावला आहे.
दहिगाव उपसा सिंचन योजनेचे उन्हाळी आवर्तन आता जवळपास संपल्यात जमा असतानाच आपल्या पंचायत समितीच्या गणातील गावांना चालू आवर्तनाचे पाणी मिळाले नसल्याचे सांगत पंचायत समिती सदस्य भरत अवताडे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावर पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी प्रतिक्रिया दिली असुन ते म्हणाले की खरं तर माजी आमदार संजयमामा शिंदे गटातील एकमेकांच्या वर्चस्वाची ही लढाई असुन अगदी अल्पावधीतच अजित विघ्ने यांनी शिंदे गटात सर्वांना ओव्हरटेक करुन पंचायत समितीचे उपसभापती पद भुषविले याचे शल्य भरत अवताडे यांना सतत जाणवत आहे.
वास्तविक पाहता पंचायत समितीच्या उपसभापती पदाचे भरत अवताडे हे प्रमुख दावेदार होते. माजी आमदार संजयमामा शिंदे हे सत्तेत नसतानाही शिंदे गटास करमाळा तालुक्यात चर्चेत ठेवण्यासाठी त्यांनी वारंवार आंदोलने केली. करमाळा नगरपालिका निवडणुकीत माजी आमदार संजयमामा शिंदे गटाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी भरत अवताडे यांनी जीवाचे रान केले.
माजी आमदार संजयमामा शिंदे आणि बागल गटात युती घडवून आणण्यातही भरत अवताडे यांनी पुढाकार घेतला होता. शिवाय माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे ते अत्यंत विश्वासू कार्यकर्ते असल्याचे सर्वत्र पसरले गेले होते. यामुळे पंचायत समिती निवडणुकीत सदस्य म्हणुन निवडुन आल्यानंतर भरत अवताडे हेच उपसभापती होतील असे किमान शिंदे गटातील सर्व कार्यकर्त्यांना वाटत असताना अजित विघ्ने यांनी बाजी मारली व अवताडे यांच्या तोंडातील घास हिरावून नेला.
अजित विघ्ने हे कानामागुन आले आणि तिखट झाले हे लक्षात येताच भरत अवताडे यांनी आता परत एकदा मुझे गिनो म्हणत राजकीय स्टंटबाजी सुरु केली आहे. दहिगाव उपसाचे आवर्तन व्यवस्थित पार पडले असुन जिथे शक्य तिथे पाणी देण्यात आले आहे. यामुळे शिंदे गटाच्या वतीने पाण्यासाठी आंदोलनाचा दिलेला इशारा ही त्या गटातील आपसातील लढाईचे पडसाद असुन अजित विघ्ने यांना पदावरून हटवण्यासाठी सुरु केलेली ही मोहिम आहे. “कही पे निगाहे कही पे निशाणा” असा या आंदोलनाचा हेतु असल्याने याकडे आम्ही केवळ राजकीय स्टंटबाजी याच नजरेतून पाहत असल्याचे पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी सांगितले.
तसेच सध्या माजी आमदार संजयमामा शिंदे गटात श्रेष्ठ कोण याची स्पर्धा चालू असुन कोण आंदोलन करत आहे तर कोण माजी आमदार संजयमामा शिंदे यांना म्हणे विधानपरिषदेवर घ्या म्हणुन शिफारस करत आहे. हा सर्व प्रकार माजी आमदार संजयमामा शिंदे यांना खुष करण्यासाठी चालू असल्याचेही तळेकर यांनी सांगितले.
