करमाळा_चौफेर
दहिगाव (प्रतिनिधी)करमाळा-माढा मतदारसंघाचे आमदार नारायण आबा पाटील यांनी दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या उन्हाळी आवर्तनाचा आढावा घेण्यासाठी प्रत्यक्ष दहिगाव येथील पंप हाऊसला भेट देऊन उजनी जलपातळीची माहिती घेतली. उजनी धरणातून भीमा नदीपात्र व विविध कालव्यातून पाणी सोडण्यात आल्याने दहिगाव योजनेच्या आवर्तनावर परिणाम होऊ लागल्याने आमदारांनी तातडीने कार्यतत्परता दाखवली. 
आमदार नारायण आबा पाटील यांनी पंप हाऊसवरील सर्व इलेक्ट्रिक पंपांची पाहणी करून पाणी डिस्चार्जबद्दल अधिकाऱ्यांकडून सखोल माहिती घेतली. त्यानंतर ज्या ठिकाणाहून दहिगाव उपसा सिंचन योजनेचे पाणी उचलले जाते त्या उजनी जलाशयातील ‘बाथ’ कडे जाऊन प्रत्यक्ष पाणी पातळी जाणून घेतली.
याबद्दल बोलताना आमदार नारायण आबा पाटील म्हणाले, “सध्या भीमा नदीपात्रात पाणी विसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याने अडचणी येत आहेत. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून उचल पाणी पातळी मर्यादा पाच मीटरने आणखी खोल केली जावी अशी मागणी आपण अधिवेशनात केली आहे. जर या मागणीस यश आले तर उन्हाळ्यातही आणखी काही दिवस आवर्तन चालू राहण्यासाठी याचा उपयोग होईल.”असे सांगून विधान सभेत केलेल्या महत्वपूर्ण मागणीचा पुनरुच्चार केला.
या वेळी शाखा अभियंता सौदणे यांनी सांगितले की, सध्या दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या पाणी पातळीवर साडे सात फूट पाणी उपलब्ध आहे. मात्र, नदीपात्रात पाणी सोडल्याने दररोज किमान एक फूट पाणी पातळी कमी होत आहे. अजून सात ते आठ दिवस इलेक्ट्रिक पंप व वीज पुरवठ्याची साथ मिळाल्यास व तांत्रिक बिघाड झाला नाही तर आवर्तन चालू राहील. विशेष म्हणजे सध्याचे आवर्तन तब्बल 110 दिवस चालले आहे,” असे सौदणे म्हणाले.
आमदार पाटील यांच्या सोबत गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता देवकाते साहेब, पंचायत समिती माजी उपसभापती गणेश चौधरी, कोंढेजचे माजी सरपंच निलेश राऊत, ठेकेदार राजेंद्र पोळ तसेच पंप हाऊस यांत्रिक विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

