संजय जाधव (केम प्रतिनिधी )
पंढरपूरच्या पवित्र मातीतील संस्कार आणि उमेद अभियानाच्या माध्यमातून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारे नेतृत्व म्हणून केम उमेद प्रभागाला विजया गायकवाड यांच्या रूपाने एक नवीन आणि कर्तव्यशील ‘सीसी’ (Cluster Coordinator) लाभल्या आहेत. पदभार स्वीकारल्यापासूनच त्यांनी महिलांच्या प्रगतीसाठी आणि त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी आपला धडाका सुरू केला आहे.

प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक: हक्काचे कार्यालय मिळाले
केम प्रभाग संघाचा गेल्या अनेक वर्षांपासून कार्यालयाचा (ऑफिस) प्रश्न प्रलंबित होता. अनेक अडचणींमुळे हा प्रश्न सुटत नव्हता, मात्र विजया गायकवाड मॅडम यांनी पदभार घेताच या प्रश्नात वैयक्तिक लक्ष घातले. त्यांनी स्थानिक ग्रामपंचायतीकडे सातत्याने पाठपुरावा करून प्रभाग संघासाठी हक्काच्या ऑफिसची व्यवस्था करून दिली आहे. त्यांच्या या तत्परतेमुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
शिवरायांच्या १० ‘उद्योग सूत्रांचा’ जागर
छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापन कौशल्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विजया गायकवाड मॅडम महिलांना उद्योजकतेचे धडे देत आहेत. हे़च सूत्रे महिलांसाठी दिशादर्शक ठरत आहेत.

व्यवसाय सुरू करताना घाबरू नका.,योग्य सहकाऱ्यांची निवड करा,नेहमी शिस्तबद्ध पद्धतीने काम करा,शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करा, स्पर्धकाला घाबरू नका, स्वतःवर विश्वास ठेवा,नियोजनावर (Planning) विशेष भर द्या,नेहमी शांत डोक्याने निर्णय घ्या,संकट काळात कधीही खचून जाऊ नका,स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करा,आपल्या सहकाऱ्यांवर विश्वास ठेवा.
जिजाऊ-सावित्री-रमाईंचा वारसा आणि संविधानाची ताकद
महिलांना मार्गदर्शन करताना गायकवाड मॅडम म्हणतात, “आपण जिजाऊ, सावित्री आणि रमाईंच्या लेकी आहोत. आपल्यामध्ये स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याची प्रचंड क्षमता आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्याला जे मौलिक अधिकार दिले आहेत, त्या बळावर आपण आपली प्रगती नक्कीच साधू शकतो.”
प्रत्येक महिलेने स्वतःच्या पायावर उभे राहून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, यासाठी गायकवाड मॅडम अहोरात्र प्रयत्नशील आहेत. त्यांच्या या कार्यपद्धतीमुळे केम प्रभागातील महिलांच्या जीवनात नक्कीच सकारात्मक बदल होईल आणि प्रभागाचा कायापालट होईल, आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महिलांकडून असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

