गेल्या १० वर्षांपासून महिलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी कार्यरत असलेल्या शिवकन्या अकॅडमी चा १० वा वर्धापनदिन आणि जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून करमाळा येथे एका भव्य स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अकॅडमीच्या वतीने विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवून महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात शिवकन्या अकॅडमीच्या नवीन फलकाच्या अनावरणाने झाली. हे अनावरण करमाळ्याच्या नगराध्यक्षा मा. मोहिनी संजय सावंत यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून नगरसेविका चैताली सावंत, प्रख्यात स्त्रीरोग तज्ञ डॉ. कविता कांबळे, अस्थिरोग तज्ञ डॉ. अपर्णा भोसले आणि श्रद्धा तपसे यांची उपस्थिती होती.
भारतीय संस्कृती आणि आरोग्याचा वारसा जपत अकॅडमीच्या सदस्य महिलांनी ‘आरोग्याची गुढी’ उभारून एक वेगळा आदर्श समाजासमोर ठेवला. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे महिलांनी सादर केलेली नाटिका. मुलीच्या जन्मापासून ते वयोवृद्ध होईपर्यंतचा तिचा संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवास या नाटिकेच्या माध्यमातून अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आला, ज्यामुळे उपस्थितांचे डोळे पाणावले.
अकॅडमीच्या संस्थापक अध्यक्षा प्रियांका गायकवाड यांनी उपस्थित महिलांना संबोधित करताना ‘माईंड ट्रान्सफॉर्मेशन’ (मानसिक परिवर्तन) या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. “केवळ शारीरिकदृष्ट्या सुदृढ होण्यापेक्षा मानसिकदृष्ट्या खंबीर होणे ही काळाची गरज आहे,” असे त्यांनी नमूद केले.
१० वर्षांनंतर पुन्हा एकदा जुन्या मैत्रीला उजाळा देऊन महिलांना एकत्र आणण्याचे काम या निमित्ताने झाले.
एका छोट्याशा रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर व्हावे, त्याप्रमाणे घरापासून सुरू झालेली ही अकॅडमी आज शेकडो महिलांचे आधारस्तंभ बनली आहे.
या मेळाव्यात महिलांनी आपले सुख-दुःख व्यक्त करत मैत्रीचे ऋणानुबंध जपले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवकन्या अकॅडमीच्या सर्व महिला सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.शिवकन्या अकॅडमीच्या या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत असून, करमाळ्यातील महिलांच्या संघटन शक्तीचे हे एक उत्तम उदाहरण ठरले आहे
†
