करमाळा_चौफेर
करमाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी तहसीलदार विजयकुमार जाधव यांना निवेदन देण्यात आले. “निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने हवेत विरली असून, सध्याच्या सरकारने केवळ ‘पात्र’ शेतकऱ्यांचा खेळ मांडला आहे,” अशी टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष अमरजीत साळुंखे यांनी यावेळी केली.

पुढे अधिक बोलताना श्री साळुंखे म्हणाले भारत देश हा कृषी प्रधान देश असून देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने शेती वरती अवलंबून आहे. वर्षानुवर्षे शेतकरी हा काबाडकष्ट करत आहे, तरी देखील त्याच्या डोक्यावरचे कर्ज काही कमी होताना दिसत नाही. त्याचे कारण म्हणजे शेती पिकाच्या उत्पादन खर्चातील व पिकांच्या दरातील असमतोल आहे. करमाळा तालुक्यातील शेतकरी हा मागील कित्येक वर्षांपासून अनंत अडचणींचा सामना करत आहे. सन २०१९ मध्ये कोरोना सारख्या महामारीत देखील शेतकऱ्यांना प्रचंड मोठे नुकसान सहन करावे लागलेले आहे. त्यानंतर दुष्काळ सदृश परिस्थिती, २०२५ मधील करमाळा तालुक्यातील अतिवृष्टी आणि सीना नदीला आलेला महापूर असेल किंवा आताची २०२६ मधील युद्धजन्य परिस्थिती असेल या सर्व घटनांमुळे करमाळा तालुक्यातील सर्वच शेतकरी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आर्थिक अडचणीत आहेत.

अतिवृष्टी, सीना नदीचा पूर आणि सततच्या सुलतानी संकटामुळे शेतकरी आर्थिक गर्तेत सापडला आहे. शरद पवार साहेब कृषिमंत्री असताना झालेली ऐतिहासिक कर्जमाफी आजही शेतकऱ्यांच्या स्मरणात आहे, तसाच ठोस निर्णय आताच्या सरकारने घेणे गरजेचे आहे. जर तातडीने अंमलबजावणी झाली नाही, तर सरकारविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा साळुंखे यांच्यासह महेश पाटील, निलेश झोळ , सचिन नवलडे आणि उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दिला आहे
मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार विजयकुमार जाधव साहेब यांनी स्विकारले


