March 26, 2026
default

default

करमाळा चौफेर/ रामनवमी विशेष!

            (शंभू फरतडे✍️)

धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील परांडातालुक्यातील डोमगाव हे गाव प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेले एक अत्यंत जागृत आणि ऐतिहासिक ठिकाण आहे. 

डोमगाव ता परांडा जि धाराशीव येथील श्रीराम मंदिर हे अत्यंत प्राचीन असून, प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेले जागृत देवस्थान मानले जाते. सीना नदीच्या काठावर वसलेल्या या मंदिरात वाळूपासून तयार केलेली हनुमानाची मूर्ती, सागवानी सभामंडप आणि समर्थ रामदासांचे शिष्य कल्याण स्वामी यांची समाधी वैशिष्ट्यपूर्ण आहे.

श्रीरामाचा पदस्पर्श: पौराणिक कथेनुसार, वनवासाच्या काळात प्रभू श्रीराम या ठिकाणी वास्तव्यास होते, ज्यामुळे या भूमीला ‘पावन’ मानले जाते.तसेच हे गाव समर्थ रामदास स्वामींचे पट्टशिष्य कल्याण स्वामी यांचे निर्वाण स्थान म्हणून प्रसिद्ध आहे.

कल्याण स्वामी महाराज प्रतिमा

 हे मंदिर सुमारे २४५ वर्षांपूर्वीचे असून संपूर्णपणे दगडी बांधकामातील आहे.सीना-कोळेगाव प्रकल्पामुळे हे मंदिर सध्या चारही बाजूंनी पाण्याने वेढलेले आहे, ज्यामुळे याला एक वेगळेच नैसर्गिक सौंदर्य प्राप्त झाले आहे.मंदिरात प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीता माता यांच्या सुंदर मूर्ती आहेत. तसेच येथे चुना आणि वाळूपासून बनवलेली हनुमानाची एक आकर्षक मूर्ती देखील आहे .याच  श्रीराम मंदिरातच कल्याण स्वामींची वाळूमध्ये तयार केलेली समाधी आहे. या समाधीवर शिवलिंग आणि पादुका विराजमान आहेत.

मंदिरातील उपलब्ध फोटो👇

समर्थ रामदासांचे लेखनिक आणि पट्टशिष्य कल्याण स्वामी यांचे १७१४ मध्ये निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर ५९ वर्षांनी येथे समाधी मंदिर उभारण्यात आले. मंदिरात त्यांच्या हस्ताक्षरातील दासबोध ग्रंथाची प्रत आजही जतन केलेली आहे .हे मंदिर इ.स. १७७३ मध्ये पहिले छत्रपती शाहू महाराज यांच्या पत्नी सकवारबाई यांनी बांधले होते.अशी माहिती उपलब्ध आहे.

समर्थांच्या आज्ञेवरून कल्याण स्वामींनी धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील डोमगाव येथे मठाची स्थापना केली आणि तिथे ३६ वर्षे वास्तव्य केले.कल्याण स्वामींच्या स्वहस्ताक्षरातील दासबोधाची मूळ प्रत आजही डोमगाव येथील मठात जतन करून ठेवलेली आहे. याच प्रतीच्या आधारे पुढे संशोधक शंकर श्रीकृष्ण देव यांनी दासबोध प्रसिद्ध केला.अशी माहिती उपलब्ध आहे. ज्या ग्रंथाचे लेखन कल्याण स्वामींनी केले, त्याची ऐतिहासिक हस्तलिखित प्रत आणि स्वतः स्वामींची समाधी डोमगाव येथे असल्याने या स्थानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

चैत्र शुद्ध प्रतिपदा ते नवमी या काळात येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. रामकथा, भजन, कीर्तन आणि रामजन्मोत्सव सोहळा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी असते.तसेच कुस्त्यांचा भव्य फड आयोजित केला जातो.

राम मंदिर कल्याण स्वामी मठ फोटो👇

 दासनवमी ला देखील  कल्याण स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त (दासनवमी) येथे विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

गुगल/ विकीपिडीया/ फेसबुक सोर्स वरील उपलब्ध माहिती वरून सा चौफेर कार्यकारी संपादक शंभूराजे फरतडे यांनी हि माहिती प्रसारित केली आहे.  रामनवमी निमित्त या मंदिराची नवीन पिढीला आणखी माहिती व्हावी हा उद्देश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *