करमाळा येथील ओम महिला कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक प्रसारक मंडळाच्या वतीने २०२६ सालचे ‘आम्ही मैतरणी नारी सन्मान’ पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. समाजातील विविध क्षेत्रांत आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या महिलांचा गौरव करणे ही सामाजिक जबाबदारी समजून गेल्या वर्षापासून हा उपक्रम राबवला जात आहे.

यावर्षी राजकीय गौरव पुरस्कार माजी नगराध्यक्षा मा. सुनिताताई वाशिंबेकर यांना जाहीर झाला असून, स्व. अनिलभाऊंच्या खंबीर साथीने त्यांनी केलेली विकासकामे व त्यांचा जनसंपर्क आदर्शवत आहे. आदर्श गुरुवर्य पुरस्कार गिरधरदास देवी विद्यालयाच्या मा. निलिमा पुंडे मॅडम यांना दिला जाणार आहे, ज्यांनी अध्यापनासोबतच नाट्य अभिनयात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

तसेच, पिठाची गिरणी चालवत मुलांचे भविष्य घडवणाऱ्या मा. सुवर्णा शिंगाडे व त्यांना खंबीर साथ देणारे मा. सतिश शिंगाडे यांना ‘संघर्ष सन्मान’ पुरस्काराने गौरविण्यात येईल. होमगार्डची नोकरी करत जिद्दीने संसार सावरणाऱ्या मा. सरोज परदेशी यांना ‘सशक्त महिला सन्मान’ प्रदान केला जाणार आहे.

हा सोहळा रविवार, २९ मार्च रोजी दुपारी ४ वाजता केमिस्ट भवन येथे नगराध्यक्षा मा. मोहिनी सावंत, सभापती मा. निर्मला गायकवाड व
डॉ.वर्षा करंजकर,मा.डॉ.कविता कांबळे व मा.डॉ.अपर्णा भोसले या डॉक्टरांच्या उपस्थितीत पार पडेल. यावेळी डॉ. कविता कांबळे गर्भाशयाच्या कर्करोग प्रतिबंधात्मक (HPV) लसीकरणाबाबत मार्गदर्शन करणार असल्याची माहिती ओम महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रा. अंजली श्रीवास्तव यांनी दिली.
