शंभू फरतडे (करमाळा चौफेर ✍️)
करमाळा येथे गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत असताना मनोजकुमार राऊत यांनी नोकरीच्या चाकोरी बाहेर जाऊन अनेक सामाजिक उपक्रम राबवले होते.विद्यार्थ्यांना बाल वयातच शास्त्रज्ञ,त्यांची नावे ,त्यांनी लावलेले शोध माहीत व्हावेत व दररोज डोळ्यासमोर रहावे या साठी सायन्स वाॅल , व शास्त्रज्ञांची जयंती उपक्रम सुरू केला होता.मनोजकुमार राऊत यांच्या सायन्स वाॅल ची दखल घेऊन खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत याचा उल्लेख करून कौतुक केले होते, तर प्रत्यक्ष शाळेवर येवून पहाणी देखील केली होती.
तसेच ग्रामीण भागातील अनेक कुटूंबातील पालकांना दारूचे व्यसन असते व या व्यसना मुळे कुटूंबातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर त्याचा परिणाम होतो. हे लक्षात घेऊन मनोजकुमार राऊत सर यांनी “दारू सोडा, पाल्याला शिष्यवृत्ती मिळवा!” हा उपक्रम सुरू केला होता.या प्रयोगाने गौंडरे ता करमाळा येथील एका कुटुंबाचे अक्षरशः सोने झाले आहे.
मनोजकुमार राऊत सरांच्या ‘दारू सोडा, पाल्याला शिष्यवृत्ती मिळवा’ यात सहभाग घेऊन गौंडरे येथील उमराव अंबारे यांनी आपले अनेक वर्षाचे दारूचे व्यसन सोडण्याचा निर्धार केला.व चार वर्षांपासून त्यांनी दारूच्या थेंबाला देखील स्पर्श केला नाही . अंबारे यांच्या मुलाने देखील वडिलांच्या निर्धाराचा व साहेबांच्या शब्दाचा मान ठेवून संघर्ष केला व आज खाकी वर्दीला गवसणी घातली आहे.
उमराव अंबारे यांनी घेतलेली शपथ आणि आज त्यांचा मुलगा पोलीस होणे, हा प्रवास खरोखरच डोळ्यांत अंजन घालणारा आहे. एका अधिकाऱ्याच्या कल्पकतेमुळे एका कुटुंबाचे नशीब पूर्णपणे बदलू शकते, हे या घटनेने सिद्ध केले आहे.

अशा प्रयोगांमुळे केवळ व्यसनमुक्तीच होत नाही, तर पुढच्या पिढीचे भविष्यही उज्ज्वल होते. MPSC मधून येणाऱ्या तरुण अधिकाऱ्यांनी खुर्चीवर बसून केवळ फायली न हाताळता, असे जमिनीवरचे प्रयोग राबवले तर समाज परिवर्तनाला मोठी गती मिळू शकते हे देखील यातुन दिसून आले आहे.

मनोजकुमार राऊत सरांचे हे कार्य आणि उमराव अंबारे यांचा निर्धार इतर अनेकांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.या यशाबद्दल मनोज राऊत सरांचे देखील सा करमाळा चौफेर च्या वतीने मनपूर्वक अभिनंदन आणि अंबारे कुटुंबाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!

एका छोट्या प्रयोगातून घडलेली ही छोटी क्रांती असली तरी याचा परिणाम खूप मोठा आहे .प्रशासनात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी चौकटी बाहेर जाऊन समाजाचा कानोसा घेऊन आपली वाटचाल केली, आपल्या शैक्षणिक सामाजिक, आयुष्यात आलेल्या संघर्षांतून धडा घेऊन समाजातील इतरांना तो संघर्ष वाट्याला येवू नये किंवा त्यातून मार्ग काढता यावा या साठी पुढाकर घेतला तर भविष्यात अनेक कुटूंब, गावे यशाला गवसणी घालू शकतात फक्त गरज आहे ती अधिकाऱ्यांच्या आतला ‘माणूस’ जागा होण्याची.

