March 21, 2026
IMG-20260321-WA0068(1)
  1.  करमाळा चौफेर (शंभू फरतडे✍️)

  पुर्वभागातील कोळगाव सबस्टेशन म्हणजे ‘असून अडचण नसून खोळंबा ‘ अशी अवस्था झाली आहे गेल्या दहा वर्षापासून कोळगाव सबस्टेशन वर अतिरिक्त भार असल्याने शेतकऱ्यांना अनेक वेळा वीज टंचाईचा सामना करावा लागला. कधी धरणात पाणी नसल्याने ,कधी वीज असून पाणी नसल्याने तर कधी टंचाई काळात संपूर्ण वीज कपात केल्याने अनेक वेळा शेतकऱ्यांच्या हतातोंडाचा घास हिरावून घेतला गेला. ऐन उन्हाळ्यात पिकांना गरज असताना तीन ते चार तास वीज भेटत नसल्याने अनेकांचे उत्पन्न निम्यांने घटले! वीजे अभावी पाणी कमी पडत असल्याने काहींना लाखो रूपये खर्चून अतिरिक्त बोअरवेल, मोटार, नवीन डिपी (रोहित्र) या साठी खर्च करावा लागला . शेतकऱ्यांचे उत्पन्न घटल्याचा व अतिरिक्त खर्चाचा हिशोब केल्यास नवीन सबस्टेशन उभा राहिल ऐवढी रक्कम शंभर टक्के शेतकऱ्यांच्या संसारातून खर्च झाली आहे. तरी देखील पुर्वभागातील शेतकऱ्यांचा संताप फक्त व्हाट्सअप ग्रुप वर महावितरणला शिवीगाळ व झिरो कर्मचाऱ्यांवर दमदाटी करण्यापर्यंतच मर्यादित आहे.

पत्रकारितेच्या माध्यमातून तसेच संघटनेच्या माध्यमातून शिवसेना उपजिल्हाप्रमुख शाहूदादा फरतडे, युवासेना तालुकाप्रमुख व पत्रकार शंभूराजे फरतडे यांनी या सबस्टेशन च्या विषयांवर अनेक अक्रमक आंदोलनं करून 5 mv ट्रान्सफार्मर, आवाटी सबस्टेशन सुरू करणे या साठी प्रंचड पाठपुरवा केला .सिना कोळगाव धरण ग्रस्त संघटनेचे अध्यक्ष सतीश बापू निळ, वंचित बहुजनचे जिल्हाप्रमुख सुभाष बापू ओहोळ, हिसरे येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल जगदाळे पत्रकार नागेश चेंडगे  यांनी देखील वेळोवेळी आवाज उठवला .या आंदोलनाचा ज्या त्या वेळेस काही प्रमाणात का होईना फायदा झालेला आहे .

वृत्तपत्रातील बातम्या विविध संघटनाचे आंदोलन याची दखल घेऊन शेवटी भाजप जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे, माजी सभापती अतुल पाटील तसेच आमदार संजयमामा शिंदे राष्ट्रवादी चे अध्यक्ष भरत आवताडे यांच्या प्रयत्नातून 5mv 3mv ट्रान्सफार्मर बसवला गेला . आमदारांच्या माध्यमातून आवाटी सबस्टेशन झाले व निमगाव गौंडरे चा काही भाग आवाटी ला जोडल्याने आत्ता कोळगाव चा भार कमी होईल असे सांगतीले गेले; तरी देखील कोळगाव सबस्टेशन वरून फक्त तिन ते चारच तास वीज का उपलब्ध होत आहे याचे गौडबंगाल समजत नाही.

संपूर्ण राज्यात आठ तास दिवसा वीज उपलब्ध करून देण्याचे शासनाचे धोरण असताना व शेजारी परांडा हद्दीतील विद्युत पंप रांत्र दिवस सुरू असताना कोळगाव सबस्टेशन वरून मात्र कधी तेल उकळले आहे,कधी सिटी जळाला आहे ,कधी केबल जळाली आहे असे सांगून दोन दोन- तिन तिन दिवस वीज पुरवठा खंडित केला जातो .मात्र ज्या पद्धतीने पश्चिम भागातील विजेच्या प्रश्नावर आजी -माजी आमदार व तालुका पातळीवरील नेते संवेदनशील असतात तेवढे कोळगाव सबस्टेशन बाबत का दिसून येत नाहीत हा देखील मोठा प्रश्न आहे. व विशेष म्हणजे पुर्वभागातील रस्ते वीज या मुलभूत प्रश्नावर पुर्ण दुर्लक्ष करणाऱ्या या आपआपल्या गटाच्या नेत्यांविरुद्ध बोलण्याचे तर सोडा पण ठाम पणे प्रश्न सोडविण्यासाठी भांडा किंवा पाठपुरावा करा असा साधा अग्रह करताना सुद्धा कोण दिसत नाही हे त्याहून मोठे गौडबंगाल आहे.

शेतकऱ्यांना न्याय हवा असतो; पण आपल्या आवडीचा नेता बोलला तरच त्याच्या मागे उभा रहायचे असते. अनेकांना आपल्याच नेत्यांविरुद्ध कसं बोलायचं हा प्रश्न पडतो, तर काहींना कोणी जरी बोलले तरी काही देणं घेणं नसतं उलट बोलणार्‍यांचे मापं काढण्यात अशी लोकं धन्यता माणतात. म्हणून सध्या आंदोलनाची धार कमी होत आहे त्यामूळे प्रशासनाचे फावले जात आहे व लोकप्रतीनीधी बिनधास्त रहात आहेत. विशेष म्हणजे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सुद्धा या बाबतीत खंत व्यक्त केली आहे . आपल्यावर अन्याय होत असताना व आपल्याच शेतकरी बांधवाचे नुकसान होत असताना आता शेतकऱ्यांकडून बघ्याची भुमिका ने घेता किंवा कुणाच्या नेतृत्वाची वाट न बघता स्वतः पेटून उठले पाहिजे , शेतकऱ्यांच्या पोरांच्या हातात फेसबुक, इंस्टाग्राम सारखे सोशल मिडियाचे मोठे हत्यार आहे त्याच्यावर मोहिम चालवली तरी परिणाम घडू शकतो ; ‘कारण घामाचे दाम मागण्यासाठी जेव्हा बळीराजा रस्त्यावर उतरतो, तेव्हा सत्तेची सिंहासनंही हलू लागतात’. अन्यायाविरुद्ध पेटून उठलेला शेतकरी हा केवळ आंदोलक नसून, आपल्या हक्कासाठी लढणारा एक योद्धा असतो.! जेव्हा नांगराचा हात मुठीत वळतो, तेव्हा व्यवस्थेलाही शेतकऱ्याच्या कष्टाची किंमत कळते. हे आंदोलन म्हणजे केवळ गर्दी नसून, मातीशी इमान राखणाऱ्यांच्या अस्तित्वाची लढाई असते हे तुमच्या लक्षात यावं यासाठी हा लेखन प्रपंच केला आहे ! बाकी लढाई तुमच्या हातात !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *