करमाळा_चौफेर (संपादकीय ✍️)
करमाळा तालूका हा जरी गटातटाचा तालूका म्हणुन ओळखला जात असला तरी सध्या तालूक्यातील स्थानिक राजकीय गटांवर राजकीय पक्ष वरचढ होताना दिसुन येत आहेत. एरव्ही हेच तालुक्यातील स्थानिक राजकीय गट, राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षांचा अगदी कडीपत्ता असल्याप्रमाणे वापर करत आपल्या खुर्च्या शाबीत ठेवायचे .पण आता मात्र तालुक्यातील महत्त्वाच्या अशा राजकीय गटांना सत्ताधारी मंत्र्यांचे उंबरे झिजवावे लागत आहेत.
करमाळा तालुक्यातील विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांचा पाटील गट, जिल्हा परिषदेच्या गटनेत्या रश्मी बागल यांचा बागल गट, खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा मोहिते पाटील गट, माजी आमदार संजयमामा शिंदे यांचा शिंदे गट, करमाळा नगरपालिकेवर सत्ता स्थापन केलेल्या सावंत बंधुंचा सावंत गट, माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा जगताप गट, अगदी अल्प मतात असला तरी प्रत्येक निवडणुकीत कार्यकर्ते उतरवणारा प्रा रामदास झोळ यांचा झोळ गट हे सगळे गट सत्तेत सहभागी होण्यासाठी स्पर्धा करत आहेत. त्यामुळे सध्या सर्वांचेच “सत्तामेव जयते!” सुरू आहे.
आमदार नारायण आबा पाटील यांच्या गळ्यात आदिनाथ कारखान्याचे दोरफास अडकवून बागल गटाने पाटील यांचा राजकिय रथ रोखला, त्यामुळे आता आदिनाथ कारखाना सुरु करण्यास तीनशे चारशे कोटी रुपयांचे पॅकेज मिळावे यासाठी हल्ली आमदार नारायण आबा पाटील हे मतदार संघात दिसुन येत नाहीत. त्यांचा सारा वेळ हा मुंबई मध्ये मुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्या बंगल्यांचे उंबरे झिजवण्यात जात आहेत. मतदार संघात काय चालले याची त्यांना जराही फिकीर नसावी.अलिकडे पाटील गटाचे पहिल्या पळीचे एक विश्वासू कार्यकर्ते यांच्या सोशल मीडिया प्रोफाइल फोटोवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो दिसु लागला आहे. याचे अनुकरण पाटील गटातील अनेक कार्यकर्त्यांनी केल्याने आता आमदार नारायण आबा पाटील हे भाजपा मध्ये प्रवेश करणार या चर्चेस ऊत आला आहे. नाहीतरी नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाकडुन आपले उमेदवार न उतरवता आमदार पाटील यांनी स्वतंत्र पक्षाकडून उतरवले होते. त्याचवेळी त्यांच्यावर सत्ताधारी मंडळीचा असलेला दबाव दिसुन आला होता.आजमितीस आमदार नारायण आबा पाटील हे सत्तेत असल्यासारखेच आहेत.
दुसरीकडे बागल गटाने पुर्णपणे भाजपात स्वतःला सामावून घेतल्याने अलिकडे बागल बहिण भावाच्या मुखातुन जय श्रीराम ह्या घोषणा आपण ऐकतच आहोत. बागल गटाच्या ताब्यात असलेल्या मकाई कायखान्यास शासकीय पॅकेज मंजुर झाले खरे, पण यातील एक चौथाई रक्कमच कारखान्याच्या बँक खात्यावर जमा झाली आहे. आता उर्वरित दोनशे कोटी मिळाले पाहिजेत म्हणुन बागल गटासमोर भाजपा शिवाय दुसरा पर्याय नाही.
माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे सध्या कसलीही सत्ता नाही. परंतु त्यांचे बंधु माजी आमदार बबनदादा शिंदे यांनी भाजपा प्रवेश केल्यानंतर आता माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी अपक्षाचे उपरणे काढुन फेकुन दिले आहे. आणि हल्ली राष्ट्रवादी (अजितदादा पवार) पक्षाचे ते पुर्णवेळ कार्यकर्ते झाले आहेत. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत त्यांनी आपले सारे कार्यकर्ते पक्षाच्या तिकिटावर उतरवले होते.
करमाळा नगरपालिकेवर सत्ता स्थापन केल्यानंतर सावंत बंधुना शहराचा विकास करण्याचे एक मोठे आव्हान समोर उभे आहे. यामुळे त्यांनीही माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या माध्यमातून शिवसेना (एकनाथ शिंदे) यांच्या पक्षाची जवळीक साधली आहे. तसेच पालकमंत्री गोरे यांच्या माध्यमातून नगर पालिकेस निधी उपलब्ध केल्याने सावंत यांचा एक पाय भाजप व एक पाय शिंदे सेनेत आहे.
माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी सुद्धा यापूर्वी करमाळा नगरपालिका निवडणुक ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या धनुष्य बाणावर लढवली असल्याने त्यांचाही रोख सत्तेकडेच आहे.
प्रा रामदास झोळ सरांनी आपली भावकी, आपले सगेसोयरे व कार्यकर्ते यांच्या सह भाजप मध्ये यापूर्वी प्रवेश केल्याने त्यांच्याही कोटावर हल्ली कमळ दिसुन येत आहे. राहत राहिला मोहिते पाटील गट पण नुकतीच खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आपणही सत्तेशिवाय दुर राहु शकत नाही हे दाखवून दिले आहे. तसेच अकूलज येथील सभापतीपद शिंदेसेनेला दिले आहे, यामुळे आता करमाळा तालुक्यातील राजकारणात विरोधकांची भुमिका बजावयास एकही गट उरला नाही. सगळ्यांचे घोडे सत्तेच्या दिशेने सुसाट धावत आहेत हे मात्र खरे !
संपादकीय सदरा साठी करमाळा_चौफेर पोर्टल चे कार्यकारी संपादक शंभूराजे फरतडे यांनी लिखाण केले आहे.
