April 8, 2026
IMG-20260408-WA0010

करमाळा_चौफेर ✍️
करमाळा शहर मंडलाच्या वतीने ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६’ अंतर्गत आयोजित दोन दिवसीय भव्य प्रशिक्षण शिबिर अत्यंत उत्साहात पार पडले. या शिबिराचा मुख्य उद्देश कार्यकर्त्यांना पक्षाची विचारधारा, केंद्र व राज्य सरकारची कामगिरी आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देऊन त्यांना वैचारिकदृष्ट्या सक्षम करणे हा होता . दोन दिवसांच्या या कालावधीत विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये भाजपचा इतिहास, अंत्योदय संकल्पना, सोशल मीडियाचा प्रभावी वापर आणि बूथ व्यवस्थापन यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर तज्ज्ञ वक्त्यांनी सखोल मार्गदर्शन केले  या प्रशिक्षण वर्गामुळे  कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, ‘राष्ट्र प्रथम’ हा विचार घेऊन जनसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व पदाधिकारी सज्ज झाले आहेत .

या शिबिरात डिजिटल युगाशी सुसंगत राहण्यासाठी कार्यकर्त्यांना नमो ॲप आणि एआय (AI) सारख्या आधुनिक साधनांची माहितीही देण्यात आली, जेणेकरून सरकारी योजनांची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवता येईल भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली हे शिबिर यशस्वीरित्या पार पडले.

शिबिराच्या पहिल्या दिवशी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी पंडित दीनदयाळ उपाध्याय, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी आणि भारत माता यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

मंडल अध्यक्ष काकासाहेब सरडे यांनी प्रास्ताविक करत शिबिराच्या उद्देशाचे विवेचन केले. यावेळेस भाजपा नेते दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर, जेष्ठ नेते संजय घोरपडे व भगवानगिरी गोसावी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत पक्षाची विचारधारा, समर्पणभाव आणि संघटनशक्तीचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी कार्यकर्त्यांना तळागाळात जाऊन प्रभावीपणे काम करण्याचे आवाहन केले.

दुसऱ्या दिवशी विविध विषयांवर मार्गदर्शनपर सत्रांचे आयोजन करण्यात आले. नितीन झिंजाडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षविचार प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवण्याचे तंत्र स्पष्ट केले. भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी बूथ विस्तार, संघटन बळकटीकरण आणि निवडणूकपूर्व तयारी यावर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच जेष्ठ नेते विठ्ठलराव भणगे, राज्य कार्यकारिणी सदस्य राजकुमार नाना पाटील आणि जिल्हा सरचिटणीस सचिनजी शिंदे यांनी आगामी राजकीय परिस्थिती, निवडणुका आणि पक्षाच्या धोरणांबाबत कार्यकर्त्यांना दिशा दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल यांनी मानले.

या शिबिरामुळे करमाळा शहरातील भाजपा संघटनेला नवी दिशा व ऊर्जा मिळाली असून आगामी काळात पक्ष अधिक जोमाने कार्यरत राहील, असा विश्वास गणेश चिवटे यांनी यावेळी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *