करमाळा शहरासह तालुक्यात अतिक्रमण करणाऱ्या लोकांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे .शहरातील तसेच गावातील मोक्याच्या जागेवर या अतिक्रमण करणाऱ्या लोकांचा नेहमीच डोळा असतो .चार बाय चार ची जरी जागा भेटली तरी हि लोकं त्या ठिकाणी ताबा मिळवून टपर्या टाकतात. एखाद्या बेरोजगार युवकांने केलेले अतिक्रमण समजून घेऊ शकतो पण शहरासह तालुक्यात अतिक्रमण माफियांचे पेव फूटले आहे.शहरात पालिका प्रशासन, आजी माजी नगरसेवक नगराध्यक्ष यांच्याशी व ग्रामीण भागात सरपंच ग्रामसेवक यांच्याशी सलगी ठेवायची व रिकामी जागा बळकवायची हा ऐकमेव धंदा सध्या जोरात सुरू आहे. अतिक्रमण करून टपर्या मारायच्या व त्या भाड्याने देयच्या हा सुद्धा फंडा जोरात सुरू असल्याचे बोलले जात आहे.
ग्रामीण भागात तर बस स्थानक, ग्रामपंचायत, जिल्हापरिषदेच्या शाळा देखील अतिक्रमणाच्या विळख्यात अडकल्या असून या टपर्या मधून गोवा गुटखा ,तंबाखू, मद्य विक्री केली जाते , गावाची गावठाणे, मोक्याच्या जागा फुकट लुबाडल्या जात असताना सरपंच ग्रामसेवक यांच्याकडून अर्थपूर्ण दुर्लक्ष केले जात आहे तसेच मतांची बेरीज साधण्या साठी या प्रकारणात लक्ष घातले जात नाही.त्यामूळे अनेक गावात गावठाणे मोडून लोकांनी शेती बागायत केली आहे तर अनेकांनी बंगले बांधले आहेत

व्यायाम शाळा,चावड्या या मध्ये देखील घूसखोरी करून अनेक वर्षांपासून बस्तान बसवले आहे. तसेच ग्रामीण भागात ग्रामपंचायत मालकीच्या जागेवर परस्पर ताबा घेऊन स्टॅम्प पेपर वर बेकायदेशीर खरेदी विक्री करून लाखो रुपयांची उलाढल होत आहे.
अनेक गावातील जुण्या तालमी ,जुणी ग्रामपंचायत कार्यालये अतिक्रमण करून या मध्ये स्वतःचे व्यवसाय टाकले जात आहेत. या बाबत पंचायत समितीकडे देखील अनेक तक्रारी दाखल असल्याची चर्चा आहे मात्र अतिक्रमण या विषयांवर प्रशासनाकडून कोणतीच ठोस कारवाई केली जात नाही.
अतिक्रमणामुळे शहरासह ग्रामीण भागातील अनेक चौकं, शाळा,सरकारी दवाखाने यांच्या परिसरात बकाल पणा वाढला असून या भागात सुशोभिरकण, वाचनालय, उभारली जावू शकतात किंवा व्यापारी गाळे काढून ग्रामपंचायत नगर पालिकेचे उत्पन्न वाढू शकते मात्र प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे अतिक्रमण करणार्यांचे फावले जात असल्याचे बोलले जात आहे.
गटविकास अधिकारी, नगर पालिका मुख्याधिकारी , जिल्हापरिषद व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी आपापल्या आखत्यारित जागेवर झालेल्या अतिक्रमणांचा आढावा घेउन ते हटवण्या बाबत मोहिम हाती घ्यावी अशी मागणी वाढत आहे.
