करमाळा चौफेर (शंभू फरतडे✍️)
६८व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार आता परमौच्च शिखरावर पोहोचला आहे. कोण जिंकणार ‘महाराष्ट्र केसरी’ची मानाची चमकती चांदीची गदा? याचा फैसला आज (दि. २२) रोजी रात्री होणार आहे. महाराष्ट्र केसरी खुल्या गटाच्या माती विभागातून सिकंदर शेख व महेंद्र गायकवाड यांच्यात अंतिम लढत रंगेल. दुसरीकडे गादी विभागातून हर्षवर्धन सदगीर व नव्या दमाचा जय पाटील हे मल्ल अंतिम फेरीत भिडतील. या दोन्ही गटातुन प्रथम येणारे पैलवान अंतिम लढती साठी भिडणार असून यातुन महाराष्ट्र केसरी निवडला जाणार आहे.यंदा सिकंदर शेख व हर्षवर्धन सदगीर हे ‘महाराष्ट्र केसरी’ किताबाचे प्रबल दावेदार असले तरी जय पाटील यांने तगडे आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे यंदाच्या स्पर्धेत कोण ‘महाराष्ट्र केसरी’ची मानाची चांदीची गदा उंचावणार, याकडे तमाम कुस्तीशौकिनांच्या नजरा असतील

वाघोली येथील ६८ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सोलापूरच्या जय पाटीलने वादळी कामगिरी केली आहे. त्याने गादी विभागाच्या उपांत्य फेरीत पुण्याच्या गत महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळला पहिल्याच मिनिटात चितपट करून सर्वांना थक्क केले आणि अंतिम फेरीत धडक मारली. त्याआधी त्याने साताऱ्याच्या दिग्विजय जाधवचा १०-० अशा फरकाने धुव्वा उडवला होता.

आता गादी विभागाच्या फायनलमध्ये जय पाटीलचा सामना माजी महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरशी होणार आहे. जयने या स्पर्धेत ज्या पद्धतीने आक्रमक खेळ केला आहे, त्यावरून तो हर्षवर्धनला तगडे आव्हान देईल अशी चिन्हे आहेत. सोलापूरच्या करमाळा येथील या युवा मल्लाने आपल्या चपळाईने कुस्तीप्रेमींची मने जिंकली आहेत. जय पाटील याच्या रुपाने पुन्हा एकदा करमाळा तालुक्याला महाराष्ट्र केसरीची संधी खुणावत आहे.

जय पाटील हा मुळचा करमाळा तालुक्यातील लव्हे गावचा मल्ल असून विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांचा सख्खा पुतण्या व युवा नेते राजूण्णा पाटील यांचा सुपुत्र आहे .त्यांचे दुसरे चुलत बंधू पै अतुल पाटील हे देखील डबल उप महाराष्ट्र केसरी व छत्रपती पुरस्कार विजेते आहेत.
करमाळा तालुक्यातील लव्हे गावचे पाटील कुटूंब कुस्ती साठी वाहून घेतलेले कुटूंब म्हणून ओळखले जाते .गोरगरीब कुटुंबातील अनेक मल्ल नारायण पाटील यांच्या तालमीत घडले आहेत. पाटील कुटूंबाचा महाराष्ट्र केसरी व्हावा अशी कुटूंबासह तालुक्याची इच्छा असून करमाळा तालुक्यातील कुस्ती शौकीनांनी जय पाटील महाराष्ट्र केसरी व्हावा म्हणून देव पाण्यात ठेवले आहेत. करमाळा चौफेर च्या वतीने पैलवान जय पाटील यांना मनपूर्वक शुभेच्छा.
