करमाळा_चौफेर (शंभू फरतडे✍️)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘जलजीवन मिशन’ योजनेचे करमाळा तालुक्यात तीनतेरा वाजले आहेत. शेकडो कोटींचा निधी खर्च करून आणि उद्घाटनांचा गाजावाजा करूनही तालुक्यातील एकाही गावात या योजनेचे काम पूर्ण झालेले नाही. परिणामी, एन उन्हाळ्यात ‘हर घर जल’ ऐवजी नागरिकांनाच पाण्यासाठी ‘घर घर’ वणवण करावी लागत आहे असे विदारक चित्र दिसत आहे.

●निधी पाण्यात: निकृष्ट कामे आणि चौकशा●
या योजनेची कामे रखडण्यामागे निकृष्ट कामांच्या तक्रारी आणि विविध पथकांच्या चौकशा ही प्रमुख कारणे आहेत. एकाच ठेकेदाराकडे अनेक गावांची कामे आणि अपुरी यंत्रसामग्री यामुळे कामांचा बोजवारा उडाला असून शेकडो कोटींचा निधी वाया गेल्यात जमा आहे.

ठेकेदार देशोधडीला: बिले थकली, काहींनी संपवले जीवन
सर्वात गंभीर बाब म्हणजे, शासनाकडून जलजीवन मिशनच्या कामांची हजारो कोटींची बिले थकवली गेली आहेत. अपुऱ्या यंत्रणेवर व्यवसायात उतरलेले नवोदित ठेकेदार बिले न मिळाल्याने दिवाळखोरीत निघाले आहेत. चौकश्यांचा ससेमिरा आणि अडकलेली बिले यामुळे काही ठेकेदारांनी आपली जीवनयात्रा संपवल्याच्या दुर्दैवी घटनाही घडल्या आहेत.तरी देखील शासनाला याचे गांभीर्य दिसत नाही.

●जनता तहानलेली: केंद्र-राज्य बेबनाव मारक●
राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्यातील बेबनाव देखील या योजनेस मारक ठरला आहे. राज्यभरात हजारो कोटी आणि करमाळा तालुक्यात शेकडो कोटी खर्चूनही नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने सरकारच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

●आधी बिले द्या, मग कारवाई करा●
या पार्श्वभूमीवर, शासनाने तात्काळ थकलेली बिले अदा करून कामे पूर्ण करून घ्यावीत. निकृष्ट काम करणाऱ्यांवर कारवाई जरूर करावी, पण त्याआधी बिले देऊन योजनेचे काम मार्गी लावावे, अशी संतप्त मागणी आता करमाळ्यातील जनतेतून जोर धरू लागली आहे.





