April 12, 2026
IMG-20260412-WA0038

करमाळा_चौफेर (शंभू फरतडे✍️)

इंटरनेट केबल टाकण्यासाठी मुंबई येथील एका खासगी कंपनीकडून करमाळा तालुक्यात नियमबाह्य व बेकायदेशीर रस्ता खोदण्याचे काम सुरू असून, या बेफिकीर ठेकेदारामुळे निमगाव हवेली येथील ॲड. श्री बालाजी इंगळे गंभीररीत्या जखमी झाले आहेत. डांबरी रस्त्यावर मुरूम टाकल्याने त्यांची मोटारसायकल स्लिप होऊन हा अपघात झाला असून, ते अजूनही शुद्धीवर आलेले नाहीत. हायवे रस्त्यावर असलेल्या मुरूमा मुळेच हा अपघात झाला असल्याचा आरोप मकाई साखर कारखान्याचे संचालक सतीश निळ यांनी केला आहे.

सदरचा अपघात ५ एप्रिल रोजी करमाळा सालसे रोडवरील वायकुळे पाटील वस्ती जवळ घडला आहे. मुरूमावरून मोटार सायकल स्लिप होऊन थेट  खोदलेल्या चारीत गेली असे काही प्रत्यक्षदर्शींनी सतीश निळ यांना सांगीतले आहे. या अपघाता पासून इंगळे बेशुद्ध अवस्थेत असून बार्शी येथील भगवंत हाॅस्पिटल येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. “

या घटनेनंतर सतिश निळ यांनी जिल्हाधिकारी सोलापूर, तहसीलदार करमाळा व पोलीस निरीक्षक करमाळा यांना लेखी निवेदन दिले आहे. “संबंधित ठेकेदाराविरुद्ध तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. गुन्हा दाखल न झाल्यास पूर्व भागातील ग्रामस्थांसोबत तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसू,” असा इशारा निळ यांनी  या निवेदना द्वारे  दिला आहे. करमाळा चौफेर च्या वतीने देखील अनेक वेळा या नियमबाह्य कामांबाबत आवाज उठवला होता. संबंधित विभागाकडे तक्रारीही केल्या होत्या. मात्र वारंवार या ठेकेदारांना पाठिशी घातले जात आहे, असा आरोप होत आहे, आज हे नियमबाह्य काम व प्रशासनाची खाबुगिरी एका वकिलाच्या जीवावर उठली आहे. “आत्ता तरी प्रशासन जागे होणार का? लोकांचे जीव यांच्या लेखी इतके स्वस्त आहेत का?” असा संतप्त सवाल नागरिकांतून विचारला जात आहे. युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांनी देखील प्रशासनाला या आगोदरच इशारा दिला असून संबंधित ठेकेदाराकडून नियमबाह्य पद्धतीने चारी खोदाई करून टाकलेली केबल काढून  रस्त्यापासून  पंधरा मिटर अंतर सोडून टाकावी व संबंधित साईडपट्टी मुरूम खडी टाकून रोलींग करून पूर्ववत करावी अन्यथा संबंधित विभागाने या मुजोर ठेकेदार कंपनीवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.

या घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या कंपनीवर गुन्हा दाखल करणार का? या कडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होत असताना तालुक्यातील लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष का होत आहे असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *