करमाळा चौफेर (शंभू फरतडे ✍️)
करमाळा तालुक्यातील गौंडरे गावाने पारंपारिक हरिनाम सप्ताहाला आधुनिक सामाजिक चळवळीचे रूप देऊन जिल्ह्यासमोरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रा समोर एक नवा आदर्श उभा केला आहे. येथे केवळ टाळ-मृदंगाचा गजरच होत नाही, तर विठुरायाच्या व रामकृष्ण हारीच्या ‘गजरा’ बरोबरच समाजाच्या सर्वांगीण विकासाचा ‘जागर’ मांडला जातो. सप्ताहाच्या निमित्ताने ‘वसुंधरा परिवार’ आणि विजय खंडागळे यांच्या संकल्पनेतून राबवलेला ‘हार-फेटा नको, तर वृक्ष हवा’ हा उपक्रम निसर्ग संवर्धनाची नवी दिशा दाखवणारा ठरला आहे. येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला भारतीय प्रजातीचे वृक्ष देऊन सन्मानित करण्याची ही प्रथा आता इतर गावांमध्येही रुजू लागली आहे.


या सप्ताहाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे केवळ आध्यात्मिक प्रवचने नसून, विज्ञानाची आणि प्रबोधनाची कास धरली जाते. डॉ. ओंकार पाटील यांच्या आरोग्य शिबिरातून गोरगरिबांना मोफत उपचार मिळाले, तर माने सरांच्या प्रयोगांतून अंधश्रद्धेवर प्रहार करण्यात आला. गटविकास अधिकारी मनोजकुमार राऊत यांच्या मुथा मॅडम यांनी घेतलेल्या मुलाखतीतून ‘मी अधिकारी कसा झालो’ स्पर्धा परीक्षेचे बाळकडू तरूणांना मिळाले, तर प्रसिद्ध नाना तंत्रज्ञान चे मार्गदर्शन लाभल्याने शेतकऱ्यांसाठी रासायनिक मुक्त शेती आणि आधुनिक ऊस तंत्रज्ञानाची माहिती झाली.

या सप्ताह मधून आयोजित केलेले सामाजिक उपक्रम म्हणजे काळाची गरज ओळखून उचललेली दिशादर्शक पावले ठरली आहेत. लहान मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी दररोज होणाऱ्या शालेय स्पर्धा आणि महिलांसाठीचे खेळ यामुळे सप्ताहात एक कौटुंबिक जिव्हाळा निर्माण झाला आहे.

मराठी शाळा वाचवा अभियान, व्यसनमुक्तीची व्याख्यानमाला आणि वयोवृद्धांचा सन्मान करून जपलेली कृतज्ञता यामुळे हा सोहळा केवळ धार्मिक न राहता एक ‘लोकउत्सव’ बनला आहे. झी टॉकीज फेम आदित्य फरतडे यांच्या शास्त्रीय संगीताच्या मैफिलीने या सोहळ्याला एक वेगळीच उंची प्राप्त करून दिली. खऱ्या अर्थाने गाडगेबाबांच्या विचारांचा वारसा चालवणारा हा सप्ताह, भक्तीच्या माध्यमातून समाज परिवर्तन कसे घडवता येते, याचे जिवंत उदाहरण ठरले आहे.आप्पांच्या करमाती या युट्यूब वरील प्रसिद्ध तकीक यांच्या विनोदी शैली मुळे भाविकांचे देखील मनोरंजन झाले.

हंकारे सरांच्या अक्रमक व भावनिक व्याख्यानाने उपस्थित युवक युवती, पालक माता भारावून गेले होते .समाजात कसे वागावे आई वडील यांचे नाव कसे उज्वल करावे याचा संदेश हंकारे सरांनी दिला.

गावातील सर्व जेष्ठ नागरिक यांचा एकत्रित पंच्याहत्तरी निमित्त वाढदिवस साजरा करून केमीकल मुक्त केक व भारतीय वृक्षटा वेल टोपी देवून सन्मान करण्यात आला हा आगळा वेगळा उपक्रम लक्षवेधी ठरला.हॅपी थॉटस चे आनंदी विचार माने सरांनी पेरले / सुंदर बैल जोडी स्पर्धा राबवून शेतकऱ्यांचा अनोखा सन्मान वृक्ष व बैल पोळ्याचे सर्व साहित्य देवून व प्रत्येकी10 किलो पेंड देवून करण्यात आला .

मान्यवरांच्या प्रतिक्रीया 👇
गावोगावी गौंडरेसारखे सप्ताह घडले, तर ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलून एक मोठी ‘सामाजिक क्रांती’ घडू शकते. केवळ अध्यात्म आणि कर्मकांडापुरते मर्यादित न राहता, जेव्हा भक्तीला विज्ञानाची आणि समाजसेवेची जोड मिळते, तेव्हा गावे स्वयंपूर्ण होतात. व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन आणि वृक्षारोपणासारखे उपक्रम राबवल्यास तरुणाईला नवी दिशा मिळेल आणि पर्यावरणाचे रक्षण होईल. –
मनोजकुमार राऊत (गटविकास अधिकारी सोलापूर )

सप्ताहातून आधुनिक तंत्रज्ञान आणि गटशेतीचे मार्गदर्शन मिळाल्यास शेती फायदेशीर ठरेल, तर आरोग्य शिबिरांमुळे गरिबांना वेळेवर उपचार मिळतील. अशा सप्ताहांमुळे गावातील गटबाजी संपून एकोपा वाढेल आणि ‘मराठी शाळा वाचवा’ सारख्या मोहिमांतून शिक्षणाचा दर्जा सुधारेल. थोडक्यात, गाडगेबाबांच्या ‘दशसूत्री’चा वारसा खऱ्या अर्थाने जपला जाऊन प्रत्येक गाव ‘आदर्श गाव’ बनेल
●विजयकुमार गुंड सर – (अध्यक्ष शिक्षक भारती )●
“या सप्ताह च्या माध्यमातून आपण सामाजिक उपक्रम राबवू अशी संकल्पना आम्ही मांडली यास खांद्याला खांदा लावून साथ देणारे सर्व ग्रामस्थ, उत्साही युवक, माता-भगिनी आणि टाळ-मृदंगाच्या गजरात भक्तीचा मळा फुलवणारे भजनकरी मंडळी यांचेही विशेष आभार मानतो. तुमच्या सर्वांच्या एकजुटीमुळेच आरोग्य शिबीर, शेती मार्गदर्शन आणि व्यसनमुक्तीसारखे उपक्रम यशस्वी झाले. अध्यात्मासोबतच समाजऋण जपण्याची ही परंपरा सर्वांच्या सहकार्याने अशीच अखंड तेवत ठेवू – वसुंधरा परिवार (गौंडरे )”
