March 24, 2026
1000766855

 करमाळा_चौफेर

करमाळा तालुक्यातील देवळाली गावातील बाळू दामोदरे यांच्या घरातील स्वयंपाकासाठी च्या गॅस टाकीचा स्फोट होऊन संपूर्ण घर उद्ध्वस्त झाले असून देवळाली गाव या स्फोटाच्या आवाजाने हादरले आहे. 

नियतीचा घाला किती भीषण असू शकतो, याचा प्रत्यय दामोदरे कुटूंब व देवळालीकरांना आला. बाळू अनंता दामोदरे यांच्या घरात झालेल्या प्रचंड स्फोटाने संपूर्ण गाव हादरले. या अग्नितांडवात दामोदरे कुटुंबाची आयुष्यभराची पुंजी, महत्त्वाची कागदपत्रे आणि कष्टाची भाकरी डोळ्यादेखत जळून खाक झाली आहे.घराची झालेली वाताहत आणि मुलांच्या जळालेल्या वह्या-पुस्तकांचे अवशेष पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. आपला संसार वाचवण्याच्या प्रयत्नात बाळू दामोदरे गंभीर भाजले असून, त्यांना उपचारासाठी सोलापूरला हलवण्यात आले आहे.

अंगावरच्या कपड्यांशिवाय आता या कुटुंबाकडे काहीही उरलेले नाही. शासनाने आणि दानशूर व्यक्तींनी या निराधार कुटुंबाला तातडीने मदतीचा हात द्यावा, अशी आर्त हाक ग्रामस्थांनी दिली आहे.

सुदैवाने मुलं बाहेर पळाल्याने वाचली!

हा स्फोट झाला तेव्हा दामोदरे यांची दोन्ही मुलं कू. श्रिषा (९ वी) व सुरेश (१० वी ) हि घरातच होती परंतू आगीच्या स्फोटांच्या आवाजाने बाहेर पळाल्याने त्यांचा जीव वाचला असून या भीषण संकटातून मुलं सुखरुप वाचल्याने सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

 ●गॅस स्फोट टाळण्यासाठी ही काळजी घ्या:●

रात्री झोपताना किंवा बाहेर जाताना गॅसचे रेग्युलेटर आवर्जून बंद करा.

-गॅसची नळी  दर दोन वर्षांनी बदला आणि ती नेहमी ओरीजिनल कंपनीचा घ्या.

-गॅसचा वास येत असल्यास विजेची बटणे चालू-बंद करू नका; तातडीने खिडक्या-दरवाजे उघडा.

– गॅस सिलिंडर नेहमी उभा ठेवा आणि तो कधीही बंदिस्त कपाटात ठेवू नका.

– शेगडी पेटवण्यापूर्वी लायटर किंवा काडीपेटी तयार ठेवा, जेणेकरून गॅस हवेत पसरणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *