करमाळा_चौफेर (शंभू फरतडे ✍️)
आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीत स्व. गोविंदबापू पाटील यांचा सिंहाचा वाटा व ‘बारा गावची पाटीलकी’ या मूळे पाटील कुटुंबाला वेगळे वलय होते. याच पुण्याईतून पैलवान नारायण (आबा )पाटील राजकारणात उतरले. जेऊरचे सरपंच ते आमदार असा त्यांचा थक्क करणारा संघर्षमय प्रवास राहिला आहे

जेऊर चे सरपंच ते आमदार
जेऊर गावचे सरपंच ,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पंचायत समिती उप सभापती, सभापती जिल्हा परिषद सदस्य (दहा वर्षं) व विद्यमान आमदार अशा विविध पदांवर आबांनी यशस्वी कामगीरी केली आहे. आमदार झाल्यानंतर आबांना मुंबईचा रस्ता सापडेल का ? अशी टिका देखील विरोधक करत होते मात्र आपल्या २०१४ च्या पहिल्यााच टर्म मध्ये शिवसेना -भाजप सरकारच्या सहकार्याने त्यांनी दहिगाव योजना सुरू करणे, तालुक्यातील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावणे, अनेक सबस्टेशन ची नव्याने उभारणी करणे अशी महत्त्वाची कामे मार्गी लावली.

●तालुका पातळीवरील राजकीय सुरवात ●
आमदार नारायण आबा पाटील यांची तालुका पातळीवरील राजकीय कारकीर्द माजी आमदार जयवंतराव जगताप गटाकडून विजयी होत झाली,त्यांनी जिल्हा परिषद, बाजार समिती मध्ये विजय मिळवला,नंतर बागल गटातून सभापती पदावर मजल मारली व त्यानंतर गनिमीकावा करत तालुक्यात स्वतःचा स्वतंत्र गट निर्माण करण्यात ते यशस्वी झाले. २००९ ची आमदारकी हुकली, पण २०१४ ला अवघ्या २५७ मतांनी विजयी होत त्यांनी कसर भरून काढली . या निवडणुकीत बागल गटाची निर्णायक पोस्टल मते बाद झाल्याने पाटील यांचा हा विजय सुकर झाला. याच काळात पाटील गटाने पंचायत समितीवरही सत्ता मिळवली होती तसेचजिल्हापरिषद अध्यक्षदेखील पाटील यांच्या मर्जीतीला होता.या निवडणुकीत देखील मोहिते-पाटील गट व जगताप गटाची साथ आमदार पाटील यांना भेटली होती.

●पंचायत समिती जिल्हापरिषद स्वबळावर●
२०१९ च्या विधान सभा निवडणूकीत पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले मात्र २०२४ ला राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून मोहिते-पाटील आणि जयवंतराव जगताप यांच्या समर्थनाने ते पुन्हा १४ हजारांच्या मताधिक्याने आमदार झाले. प्रचंड मताधिक्य मिळाल्याने आत्मविश्वास वाढलेल्या पाटील गटाने जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीत मोहिते-पाटील व जगताप यांना ऐनवेळी डच्चू देत स्वतंत्र निवडणूक लढवण्याची खेळी खेळली.मात्र ती सपशेल अपयशी ठरली .तिन गट एकत्र असताना मताधिक्य मिळाले मात्र महत्वाची पंचायत समितीची सत्ता गेली. निष्ठावंतांना डावलून नवख्यांना संधी आणि उमेदवारी देताना अर्थकारणाच्या झालेल्या चर्चा यामुळे पदरमोड करून आबांना आमदार करणारे कार्यकर्ते दुखावले गेले व निवडणुकीत अलिप्त राहिले.परिणामी, आमदारकीला मोठे मताधिक्य मिळाले असले तरी महत्त्वाची पंचायत समितीची सत्ता गमवावी लागली.

●पराभवाने कार्यकर्त्यांत मरगळ●
जिल्हापरिषदेत पंचायत समाती निवडणूकीत झालेला पराभव, आदिनाथ ची दुरावस्था या मुळे पाटील गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मरगळ असून नेत्यांचाही आत्मविश्वास कमी झाल्यासारखा वावर आहे. सरकार च्या विरोधात असल्याने तालुक्यात विकासनिधी नाही आणि कामे ठप्प आहेत.त्यामुळेच विरोधक पाटील गटाला कोंडीत पकडत आहेत.

●आदिनाथ ची सत्ता ठरली शाप?●
तालुक्यात ‘ज्या गटाकडे आदिनाथ, त्यांची राजकीय वाताहत’ हे समीकरण आजपर्यंत ठळकपणे दिसून आले आहे. बागल गट ,जगताप गटाला याचा अनुभव आलेला आहे. पाटील गटाला आदिनाथ कारखाना सुरू करण्यात आलेले अपयश आणि कामगारांच्या थकीत पगारी ही कारणेही जिल्हापरिषद पंचायत समितीनिवडणुकीतील अपयशाला कारणीभूत ठरली आहेत.त्यामुळेच तालुक्यातील राजकारण्यांना आदिनाथ ची सत्ता शाप ठरते या चर्चेस बळ मिळाले आहे.
●भविष्यात तडजोड की एकला चलो रे?●
भविष्यात आदिनाथ कारखाना सुरू करण्यासाठी पाटील गटाला मोठी राजकीय तडजोड करणे गरजेचे आहे.आदिनाथ सुरू झाला तरच पुढची गणीतं सुकर होणार आहेत. तसेच विधानसभा निवडणुकीपूर्वी कार्यकर्त्यांना बूस्टर डोस देण्यासाठी सत्तेत समाविष्ट होण्याशिवाय पर्याय दिसत नाही. सध्या जगताप, शिंदे व बागल गटांनी नारायण पाटील यांना आमदारकीपासून रोखणे हेच टार्गेट ठेवले आहे. मात्र विधानसभा निवडणुकीच्या वेळी हे त्रिकूट एकत्र राहील का ? यावर बरीच गणीतं अवलंबून आहेत.

आमदारकी असतानाही जिल्हा परिषद-पंचायत समितीत पराभव झाल्याने ढेपाळलेल्या गटाला ऊर्जित आणण्यासाठी नेतृत्वाला मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत. अन्यथा ‘कालचा दबदबा’ इतिहासजमा होऊन ‘उद्या’ प्रश्नचिन्हात राहील, अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे.

करमाळा चौफेर न्युज पोर्टल करमाळा तालुक्यातील
पाटील, बागल, जगताप, शिंदे व मोहिते पाटील गटांचा मागील राजकीय प्रवास सद्यस्थिती मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे. पुढील लेखात बागल गटाच्या जनाधाराचा लेखाजोखा मांडणार आहोत.
●जनाधाराचा लेखाजोखा●
वाचत रहा करमाळा_चौफेर न्युज पोर्टल…..
(शंभू फरतडे ✍️)



