March 19, 2026
IMG-20260317-WA0047

सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये संपूर्ण देशभरामध्ये पेट्रोल, डिझेल या इंधनटंचाईसह एलपीजी गॅसची टंचाई जाणवू लागलेली आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातही त्याच्या झळा आता बसू लागलेल्या आहेत. यावरती बायोगॅस हा शेतकऱ्यांसाठी एक शाश्वत पर्याय उपलब्ध आहे. Iresoil अग्रोटेक या कंपनीच्या सहकार्यातून व शिवकस्तुर फार्मर प्रोडूसर कंपनीच्या माध्यमातून करमाळा तालुक्यांमध्ये बायोगॅस प्रकल्प युनिट उभा करण्याचे काम सध्या सुरू असून ज्या शेतकऱ्यांना याचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी आपल्याशी संपर्क साधावा असे आवाहन शिवकस्तुर फार्मर प्रोडूसर कंपनी अध्यक्ष सुजित तात्या बागल यांनी केले आहे.

या प्रकल्पाविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की,बायोगॅस व जैविक खत, औषध निर्मितीच्या या प्रकल्पाचे मूल्य ५६०००/- रूपये आहे. युनिट उभा करत असतानाच CSR फंडामधून २४०००/- रूपये अनुदान वजा करून उर्वरित ३२०००/- रूपये रक्कम शेतकऱ्यांनी भरणे अपेक्षित आहे.ही रक्कम भरल्यानंतर व युनिट चालू झाल्यानंतर शासनाकडे प्रस्ताव सादर केल्यानंतर १६०००/- अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होते म्हणजे शेतकऱ्यांना हे युनिट फक्त १६०००/- रुपयांमध्येच मिळते.

या बायोगॅस युनिट मधून दिवसाला ९०० ग्रॅम गॅस तयार होतो. हा गॅस १० माणसाच्या कुटुंबाला दिवसभराचा स्वयंपाक बनवूनही शिल्लक राहतो.या युनिट मधून जी स्लरी बाहेर पडते त्याचे लिक्विड आणि पावडर फॉर्ममध्ये आपल्याला खत तयार करता येते.स्लरी गाळून खाली जाते ते पाणी आपल्याला बॅरल मध्ये साठवून ती ठिबक मधून सोडण्यासाठी उपयोगी पडते म्हणजेच हा फक्त बायोगॅस प्रकल्प नाही तर या माध्यमातून वेगाने तयार होणारे उपयुक्त असे शेणखत ही आपल्याला मिळते. आणि स्लरीही औषध म्हणून आपल्याला पिकांना ठिबक मधून सोडण्यासाठी किंवा फवारणीसाठी ही वापरता येते . हा बायोगॅस व जैविक खत प्रकल्प घरोघरी बसवणे शेतकरी हिताचे आहे.

हा प्रकल्प उभा करण्यासाठी सस्टेन प्लस एनर्जी फाउंडेशन चे संजय पिरंगुटे, Iresoil अग्रोटेक चे अमर पाटील, दीपक गवळी यांचे सहकार्य लाभत असल्याचे बागल यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *