April 1, 2026
IMG-20260401-WA0035

         करमाळा_चौफेर (शंभू फरतडे✍️)

आमदार नारायण पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी बागल आणि शिंदे गटात एक ‘गुपित करार’ झाल्याचा दावा करून मोठा भांडाफोड केला आहे. माजी आमदार शिंदे यांच्या निमगाव येथील फार्म हाऊसवर शिंदे व बागल यांच्यात एक गुप्त बैठक झाली असून त्यांच्या मते, या गुप्त बैठकीत बाजार समिती सभापती पदी दिग्विजय बागल आणि पंचायत समितीचे सभापतीपद बागल गटाकडे ठेवण्याचे, व या बदल्यात आगामी आमदारकीसाठी संजयमामा शिंदे यांना पाठिंबा देण्याचे ठरले आहे असा गौप्यस्फोट करून खळबळ माजवून दिली आहे.

भविष्यात जिल्हापरिषद अध्यक्ष पदावर किंवा महत्वाच्या समितीवर रश्मी बागल यांना संधी देण्यासाठी शिंदे बंधूच्या समर्थक जिल्हापरिषद सदस्यांनी मागणी करण्याचे देखील या गुप्त बैठकीत ठरले आहे असे तळेकर यानी सांगीतले आहे. समान जागा असताना पंचायत समितीत बागल गटाचा सभापती करून शिंदे यांनी शब्द पाळला असून भविष्यात बाजार समिती व जिल्हापरिषदेत बागलांना संधी दिली जाऊ शकते मात्र या मुळे विधान सभा निवडणूक लढवण्याचे दिग्विजय बागल यांचे स्वप्न धुळीस मिळाले आहे असा दावा तळेकर यांनी केला आहे.

 

तळेकर यांनी म्हटले आहे की मला मिळालेली ही माहिती जर चुकीची वाटत असेल तर बागल गटाने जानेवारी महिन्यात शिंदे यांच्या फार्म हाऊसवर झालेल्या बैठकीतील माहिती जनतेसमोर उघड करावी ,अथवा “आगामी विधानसभा निवडणुकीत बागल गटाचा कोणास पाठींबा नसणार असल्याचे स्पष्ट करुन माजी आमदार संजयमामा शिंदे यांना आपला विरोध असल्याचे जाहीर करुन दाखवावे ” असे आवाहन देखील पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी केले आहे.

तळेकर यांनी केलेल्या या खळबळजनक दाव्यामुळे तालूक्यात उलटसुलट राजकीय चर्चा सुरू आहे.  तळेकर यांनी कोणतेही राजकीय कारण नसताना अचानक हा दावा केल्याने पाटील गटाकडून नेमकी कोणती चाल खेळली जात आहे का? या बाबत देखील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. तळेकरांच्या दाव्याचे जगताप गटात देखील पडसाद उमटणार हे नक्की आहे.

बागल – शिंदे युतीला माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी देखील पाठिंबा दिला होता व सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर जगताप गटाची सत्ता आहे. जगतापांचे वर्चस्व असलेली नगर पालिका देखील जगताप गटाच्या हातुन गेलेली आहे. सध्या फक्त करमाळा बाजार समितीवर जगताप यांची सत्ता आहे.

तळेकर यांच्या या दाव्यानंतर बागल गटाकडून यास काय उत्तर दिले जाणार का? याकडे संपुर्ण तालूक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *