April 3, 2026
20260403_143616-BlendCollage

करमाळा_चौफेर (शंभू फरतडे✍️)

संजयमामा शिंदे व बागल गटात फिक्सिंग झाली असून बागल गटाने विधान सभा निवडणूकीत संजयमामा यांना पाठिंबा देण्याच्या  बदल्यात जिल्हापरिषद, पंचायत समिती व कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत शिंदे यांनी बागल यांना सहकार्य करण्याचे ठरले असल्याने ‘दिग्विजय बागल यांचे आमदारकीचे स्वप्न धुळीस मिळाले ‘ असल्याचा खळबळजनक आरोप  पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी काल केला होता. यानंतर तालुक्यातील राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू झाली होती यास बागल गटाचे खंदे समर्थक सतीश बापू निळ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

बागल पाटील गटाच्या आरोप प्रत्यारोपाने करमाळ्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. बागल गट विधानसभेला उमेदवार देणार नाही, या तळेकरांच्या विधानाला नीळ यांनी ‘भंपक’ आणि ‘नैराश्यातून आलेली बडबड’ म्हटले आहे. रश्मीदीदी आणि दिग्विजय भैय्या बागल यांच्या वाढत्या प्रभावामुळेच विरोधकांनी धास्ती घेतल्याचा दावा त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.

अधिक बोलताना सतीश नीळ यांनी म्हटले आहे की,पाटील गटाला आमदार असून विकासकामांत आलेले अपयश आणि जिल्हा परिषद निवडणुकीतील पराभवामुळे पाटील गटात अस्वस्थता आहे. स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठीच बागल गटाविषयी वावड्या उठवल्या जात आहेत. ज्या पक्षाच्या जिवावर निवडून आले, त्यांनाच विसरणाऱ्या प्रवृत्तीवर आता कोणीही विश्वास ठेवणार नाही. बागल कुटुंबाची ताकद पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून, आगामी काळात जनताच योग्य निर्णय घेईल, असा विश्वास नीळ यांनी व्यक्त केला आहेत तसेच चुकीच्या व्यक्तीला आमदार केल्याचा देखील जनतेला पश्चाताप होत असल्याचा सणसणीत टोला लगावला आहे.

सतीश निळ यांनी पाटील गटाला जशास तसे उत्तर दिले असले तरी दिग्विजय बागल विधासभा लढवणार आहेत असे ठाम पणे सांगीतले नसल्याने शिंदे बागल गटात झालेली फिक्सिंग खरी आहे का? या बाबत मात्र चर्चा सुरूच आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *