करमाळा चौफेर (शंभू फरतडे ✍️)
वीट येथील सौ. शुभांगी विपुल जाधव (माहेरचे नाव शुभांगी बाळनाथ जगदाळे) यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अन्न व नागरी पुरवठा विभागामध्ये तालुका पुरवठा निरीक्षक अधिकारी या पदावर निवड झाली आहे.
अत्यंत प्रतिकूल परिस्थिती, कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत आणि तब्बल 8 वर्षे सातत्याने अभ्यास करत त्यांनी हे घवघवीत यश संपादन केले आहे. दोन मुलींचे संगोपन, पतीच्या नोकरीनिमित्त होणाऱ्या सततच्या बदल्या या सर्व अडचणींवर मात करत त्यांनी ही कामगिरी केली आहे.
शुभांगी जाधव यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हिसरे (ता. करमाळा) येथे झाले. माध्यमिक शिक्षण हिसरे येथीलच श्री सिद्धेश्वर विद्यालयात, तर 11 वी व 12 वीचे शिक्षण शारदानगर (बारामती) येथे पूर्ण केले. पदवी शिक्षण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पूर्ण केले आहे.
●कुटुंबाची साथ ठरली मोलाची●
शुभांगी यांचे पती श्री. विपुल जाधव हे फेडरल बँकेत वरिष्ठ व्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत. पतीच्या सततच्या बदल्या व कुटुंबाची जबाबदारी असतानाही त्यांनी अभ्यासाची कास सोडली नाही. विशेष म्हणजे यापूर्वी सन 2020 मध्ये त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदावरही निवड झाली होती.

त्यांच्या या यशामुळे वीट व हिसरे येथील ग्रामस्थ प्राथमिक माध्यमिक शिक्षण संस्थेचे सर्व शिक्षक ,यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक यांच्याकडून शुभांगी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





