तीन वर्षे गुहेत बसणार्या आ. संजयमामा शिंदे यांना आता गावपाराची आठवण झाली असून जनते समोर जाताना ते न केलेल्या कामाचा पाढा वाचून दाखवत आहेत, असा घणाघाती आरोप पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केला.
सध्या विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांचा गावभैट दौरा चालू असून याबाबत मागील काही दिवसांपासून पाटील गटाकडून कसलीही प्रतिक्रिया दिली जात नव्हती. परंतू आज पाटील गटाकडून हा गावभेट दौरा केवळ आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काढला गेल्याचा थेट आरोप केला गेला. यावर सविस्तर बोलताना तळेकर म्हणाले की वास्तविक पाहता विद्यमान आमदार महोदयांना गावभेट दौरा काढण्याचा अधिकार असून तो त्यांच्या कार्यपद्धतीचा एक भाग असल्याचे वाटून याकडे आम्ही दुर्लक्ष केले.परंतू या गावभेट दौऱ्यादरम्यान आमदार शिंदे हे त्यांनी न केलेल्या कामांचा ढोल बडवू लागल्याने आता जनतेला खरे काय ते सांगावे लागते आहे. कुकडीच्या पाण्याची आवर्तने आणण्यासाठी विद्यमान आमदार अपयशी ठरले. कुकडीचे पाणी मांगी तलावात आणून तेथून एम आय डी सी मध्ये आणून उद्योगास चालना देण्याच्या घोषणेचे काय झाले? माजी आमदार नारायण पाटील यांच्या काळात कुकडीची सतरा आवर्तने करमाळा तालूक्यास मिळाली, विद्यमान आमदार महोदयांनी किती आवर्तने आणली? कुकडीची सुमारे चार हजार कोटी रुपयांची तरतूद असलेली सुप्रमा तत्कालीन मंत्री प्रा राम शिंदे व माजी आमदार नारायण पाटील यांनी मंजूर करुन घेतली, यानंतर विद्यमान आमदार महोदयांनी कुकडीसाठी किती निधी उपलब्ध करून दिला? नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजना हा माजी आमदार नारायण पाटील यांच्या संकल्प असून याबाबत लवकरच मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी याबाबत आश्वासन दिले आहे. आणि मग आता विद्यमान आमदार महोदयांना कुकडीचे पाणी उजनीत सोडून नंतर ते कुकडी प्रकल्प समाविष्ट भागात सोडण्याचे सुचने म्हणजे स्वतः आमदार याबाबत किती गंभीरतेने पहात होते याचे उत्तर जनतेला मिळाले. जर राज्याचे मुख्यमंत्री करमाळा मतदार संघात आले असता विद्यमान आमदार मात्र त्यावेळी एकही निवेदन सादर करु शकत नसतील तर हे मतदार संघाचे दुर्दैव असल्याचे देखील तळेकर यांनी म्हटले आहे.
आता उगीच दिशाभूल करणे सोडून विद्यमान आमदार महोदयांनी त्यांचे अपयश झाकु नये. राज्यात सत्तांतरानंतर माजी आमदार नारायण पाटील यांना थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठबळ दिल्याने आता आपले राजकीय अस्तित्व राहणार नाही ही भीती आमदार शिंदे यांना वाटू लागल्याने ते आता गावभेट दौरा काढत आहेत. यात त्यांनी किमान माजी आमदार नारायण पाटील यांनी केलेल्या तसेच प्रस्तावित कामांचे खोटे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करु नये.करमाळा मतदार संघासाठी विद्यमान शिंदे-फडणवीस सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करुन जास्तीत जास्त विकासकामे मंजूर करुन घेण्यासाठी माजी आमदार नारायण पाटील हे अहोरात्र झटत असून रखडलेली विकासकामे पुर्ण करणे हे त्यांचे ध्येय आहे. आमदार शिंदे हे गावभेट दौरा करत असताना त्यांनी आता सन 2019 नंतर करमाळा तालुक्यातील विकासकामांसाठी किती निधी मंजूर करुन घेतला व त्यांच्या या कालावधीत किती कामे पूर्ण झाली याचा तपशील जनतेसमोर मांडावा. सध्या तरी प्रत्यक्षात निधी आणण्यासाठी आ. संजयमामा शिंदे हे अयशस्वी ठरले असून या गावभेट दौऱ्याचे फलित फारसे लोकहिताचे नसणार आहे. जनतेचा व अधिकाऱ्यांचा वेळ वाया घालवण्याचा हा प्रकार असून शिंदे गटातील कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी केलेली ही खटाटोप असल्याचे पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी सांगितले.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.