loader
Breaking News
Breaking News
Foto

आगामी निवडणूका व प्रचाराचे मुद्दे -✍सूनील तळेकर (राजकीय विश्लेषक

येत्या काही महिन्यात जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या निवडणूका घोषित होतील. करमाळा तालुक्यात पुन्हा एकदा जो तो राजकीय गट आपली राजकीय ताकद पणाला लावून या निवडणुकीत उतरणार असे सद्या गृहीत धरले तर हरकत नसावी. आता जिल्हा परिषद व पंचायत समिती या दोन स्थानिक स्वराज्य संस्थांची ही निवडणूक असल्याने प्रचारामध्ये सुद्धा या संबंधितच मुद्दे असतीलच असे नाही. कारण निवडणूकीत प्रचार काळात अनेक मुद्दे उदयाला येत असतात. मग कधी ते संबधित तालुक्यातील, गटातील वा गणातील त्यावेळी घडलेल्या घटनांवर अथवा वादांवरही असु शकतात. तर कधी निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवाराच्या वैयक्तिक व्यक्तिमत्व, हातून घडलेल्या चांगल्या/वाईट बाबी, भ्रष्टाचार आदि सह अनेक लहान सहान विषय कि जे केवळ व्यक्तिदोषापोटी त्या निवडणूकीत प्रचाराचा मुद्दा म्हणून वापरण्यास विरोधक मागे पुढे पहात नाही. या सर्व गोष्टी लक्षात घेता करमाळा तालुक्यातील निवडणूका कोणत्या मुद्दयावर अधिककाळ स्थिर राहणार हे पाहणे उत्सुकतेचे आहे. प्रामुख्याने जिल्हा परिषद उमेदवारासाठी ही निवडणूक फारशी मुद्दयांनी गाजलेली नसतेच. कारण त्याचे सभा, कामकाजांचे कार्यक्षेत्र हे जिल्ह्याच्या ठिकाणी असल्याने तेथील गाजलेले मुद्दे अगदी गावोगाव पोहचणे अशक्य असते. कधी तरीच एखादा दुसरा मुद्दा जिल्हापरिषद सदस्याला प्रसिद्धी मिळवून देणारा असतो. पण असे मुद्दे आणि असे सदस्य बोटावर मोजण्याइतक्या संख्येत असतील. पण पंचायत समितीच्या उमेदवारास मात्र प्रचारात अनेक मुद्यांवर घेरले जाऊ शकते. कारण त्याच्या कामाचे मोजमाप करण्याचे क्षेत्र तालुक्यातच असल्याने याचे पडसाद गणातील अगदी वाडीवस्तीवर जाऊन पोहचलेले असतात. यामुळेच मग आगामी निवडणुकीत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका कोणत्या मुद्दयावर अधिक प्रमाणात गाजणार हा आतापासूनच चर्चेचा विषय असू शकतो.या दोन्ही संस्थांच्या वतीने लाभधारकांसाठी विशेष योजना शासन राबवते. मग यात घरकुल, शौचालय, इतर लाभ साहित्य मग यात शिलाई मशीन, शेवया मशीन, पिको फाॅल मशीन यासह इतर काही साहित्य आदिचा समावेश असतो. तर शेतकऱ्यांसाठीही विहीर, शेतीपंप मोटार व वीज साहित्य, पाईप, कोळप्यापासून ते अगदी ट्रॅक्टर पर्यंत शेतीपयोगी साहित्य समाविष्ट असते. तर दुसरीकडे वैयक्तिक यौजनांबरोबरच सेस फंडातून रस्ते मुरमीकरण, खडीकरण, वस्ती वा गावासाठी पाण्याची सोय म्हणून हापसे (कूपनलिका), वीज पुरवठा, आरौग्यकेंद्र, शाळांचे सक्षमीकरण आदि सामुदायिक लाभ मिळवून देणार्‍या बाबी सुद्धा येतात. सर्वसामान्य शेतकरी, नागरिक, मागासवर्गीय लाभार्थी, महिला बचत गट आदिंना जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या निवडणूका साठी लक्ष केले जाते. परंतू प्रामुख्याने हा प्रचाराचा मुद्दा असुनही तो क्वचितच प्रचारकाळात सर्व दिवस गाजेल अशी शक्यता कमी असते.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

आता करमाळा तालुक्यातील इतर मुद्दे कि जे या निवडणुकीत आपला प्रभाव टाकू शकतील अशी शक्यता आहे त्यावर एक प्रकाशझोत टाकूया. करमाळा तालुक्यात एकुण चार साखर कारखाने आहेत. ऊस उत्पादक शेतकर्‍यांची संख्या ही अंदाजे एकुण मतदारांच्या चाळीस टक्के इतकी असेल. यामुळेच मग या कार्यक्रमाद्वारे झालेले गाळप व ऊसतोड नियोजन कार्यक्रम यापासुन ते दिलेला ऊसदर हा मुद्दा अचानक पंचायत जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत वर येऊ शकतो. श्री मकाई, श्री भैरवनाथ व श्री कमलाई हे कारखाने आपले यंदाचे गाळप हंगाम संपवून बसले आहेत. तर आदिनाथ हा कारखाना सुरु झालाच नाही. यामुळे आता मकाई हा कारखाना सहकारी तत्त्वावर असल्याने याचे कामकाज प्रचारात मुद्दा बनून बागल गटास फायदाही देऊ शकतो तर कधी तोट्याचाही ठरु शकतो. बागल गट हा आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांच्या कडे असलेल्या मकाई सहकारी साखर कारखाना यास शक्तीस्थळा प्रमाणे वापरून पश्चिम भागातील उमेदवारांना मतांचे बळ देऊ शकेल. कारण मकाई कारखान्याचे भागधारक हे जरी सर्वत्र असले तरी सर्धाधिक संख्या हि या भागात असल्याने या भागातील बागल गटाच्या उमेदवारांना मकाईचा मुद्दा फायद्याचा ठरु शकतो. तर तालूक्यात इतर ठिकाणी बहुतांश गावात मकाईचे भागधारक आहेत, परंतू त्यांची संख्या त्या गणातील अथवा गटातील बागल गटाच्या उमेदवारास जिंकूनच देईल इतपत नाही. यामुळे मकाई हा प्रचाराचा मुद्दा बनणार याची शक्यता नाकारता येणार नाही. याबाबत हा मुद्दा बागल गट किती प्रभावी पणे सकारात्मक मांडतो आणि विरोधक किती प्रभावी पणे नकारात्मक मांडतो यावरच या मुद्द्यावरून निवडूक रंग घेऊ शकते.

राजकीय विश्लेषक (✍सुनिल तळेकर)

आता श्री भैरवनाथ कारखाना हा जरी करमाळा कार्यक्षेत्रात येत असला तरी या कारखान्याचे नेतृत्व इतर तालुक्यात असून तेथील निवडणूकीत ते सक्रीय व व्यस्त असल्याने श्री भैरवनाथ कारखाना हा प्रचाराचा मुद्दा कधीच बनू शकणार नाही.परंतू मतदाना दिवशी कोणत्या उमेदवारास मदत करावी अशा सुचना ऐनवेळी कारखाना नेतृत्व कारखाना प्रशासनाद्वारे निगडीत ऊस उत्पादक सभासद, कामगार, वाहतूकदार आदिंना देऊ शकेल. पण हि बाब प्रचारा इतकी उघड नसेल. श्री कमलाई हा कारखाना विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांचेशी निगडीत असल्याने याचा वापर मुद्दा म्हणून आमदार शिंदे गट करु शकेल. पण हे आवाहन स्विकारताना ऊसदर, ऊसतोड नियोजन या बाबी फायदेशीर ठरणार असतील तरच आमदार शिंदे गटाकडून या कारखान्याच्या कामकाजाचा सकारात्मक मुद्दा निवडणूकीत येऊ शकेल. परंतू कारखाना प्रशासन व कामगार यंत्रणेचा वापर बागल गट व शिंदे गट जरुर करतील हि शक्यता नाकारता येणार नाही. आता आदिनाथ हा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीसाठी प्रचाराचा मुद्दा बनू शकेल का तर याचे उत्तर नाही असेच म्हणावे लागेल. प्रचारात हा मुद्दा जरुर येईलही पण याचा प्रभाव मतदारांवर कितपत पडणार हे निवडणूक निकालानंतर समजेल. कारण याची काही ठळक कारणे आहेत. आदिनाथ बंद झाला हि प्रोसेस काही एका दिवसाची वा एका गाळप हंगामाची नाही. अनेक वर्षे गैर नियोजन व भ्रष्टाचार यामुळेच हा कारखाना अधोगतीकडे गेला. बागल गटास याचा फटका अधिक काळ सत्ताधारी असल्याने बसु शकत होता. परंतू भाडेपट्टी करार करणे व साखर विक्री करुन तो करार परत रद्द करण्यासाठी कोर्टात जाणे याबाबी सभासदांनी स्विकारल्या जाण्याचीच जास्त शक्यता आहे. परंतू मागील कारभारावर बोट ठेऊन विरोधक जितके प्रचारामध्ये जोर देतील तितकाच जास्त तोटा बागल गटासच होऊ शकेल.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

आमदार शिंदे गटास मात्र विषय आदिनाथ कडे वळाल्याचा फायदा अधिक होऊ शकतो.आज आदिनाथच्या मुळ मतदार सभासदांकडे केवळ आदिनाथचेच शेअर्स आहेत असे नसुन एका एका ऊस उत्पादकांकडे जवळपास दहा ते पंधरा इतर साखर कारखान्यांचेही शेअर्स आहेत. ऊस उत्पादक शेतकर्‍यांना ऊस घालवण्यासाठी आजवर (यंदाचा अपवाद वगळता) पर्याय असल्याने बागल गटावरील सभासद मतदारांचा राग पहिल्या इतका नसणार आहे. केवळ राजकीय वापरासाठी आदिनाथचा मुद्दा प्रत्येक निवडणुकीत येतो हे आता सभासदही जाणून आहेत. या शिवाय बागल गटाने कारखाना संकटाच्या खाईत ढकलला अशा आरोपाची शिक्षा सभासदांनी बागल गटास जि. प निवडणूक (२०१७-१८) व विधानसभा निवडणुक (२०१९) यामध्ये दिलीच आहे.परत परत त्याच मुद्दयावर प्रचार करणे हे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मध्ये तरी विरोधकांच्याच अंगलट येऊ शकण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतू योग्य मांडणी असल्यास याची झळ बागल गटास बसू शकते.आदिनाथ कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जेंव्हा लागेल तेंव्हा त्या निवडणूकीत मात्र बागल गटास या मुद्यावर विरोधक घेरतीलही आणि बागल गटास सभासदांचीही साथ मिळणे अवघड जाईल हे वास्तव असेल. आदिनाथ बद्दल सहानभुती असलेला सभासद शेतकरी आता आपल्या ऊस पिकास व्यापारी नजरेतुन पहात गाळपासाठी भरपुर पर्याय हाती असल्याने आदिनाथकडे जरा दुर्लक्षित पणाच करत असावा ही बाब नुकत्याच झालेल्या आदिनाथ कारखान्याच्या आॅनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सहभागातून दिसून येते. जरी ऊस उत्पादक शेतकरी आॅनलाईन सभा सहभागासाठी मोबाईल वापरात पारंगत नसेलही परंतू प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी सुशिक्षीत मुलं मूली आहेत की जे गुगल, अॅनराईड मोबाईल वापर, आॅनलाईन खरेदी-विक्री, आॅनलाईन सभा काॅन्फरन्स आदिबद्दल अगदी पारंगत अशीच आहेत. सभासद शेतकरी आदिनाथच्या वास्तवाबाबत जागरुक व दृढ इच्छा बाळगून असता तर कशाही प्रकारे आॅनलाईन सभेची लिंक क्लिक करुन यात सहभागी झाला असता. या सर्व बाबींचा विचार करता वरकरणी जरी आदिनाथचा मुद्दा प्रचारात आला तरी तो मतदारांना प्रभावी करुन एकुण निकालावर परिणाम करण्याची शक्यता अजिबात नसेल. आता विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांनी गेल्या दोन अडीच वर्षात केलेल्या विकासकामांचा मुद्दा निवडणूकीवर परिणाम करु शकतो. परत या मुद्यावर विरोधक कशी मांडणी करतात व आमदार शिंदे हे विरोधकांचे मुद्दे कसे खोडून काढतात यावरच या मुद्द्याचा मतदारांवरील परिणाम अवलंबून आहे. लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजनेचा आदेश, वीज बिल वसुली, दहिगाव उपसा सिंचन योजना आवर्तनातील पाण्यापासुन वंचीत घटक या बाबी आमदार संजयमामा शिंदे यांना प्रचारकाळात डोकेदुखी ठरु शकतील. तर पाटील गटातून गट सोडून गेलेले कार्यकर्ते हि थोडीफार प्रमाणात माजी आमदार नारायण पाटील यांच्या डोकेदुखीचे कारण होऊ शकेल. याशिवाय कोरोना काळ, लसीकरण,उजनी पाणी नियोजन व पुनर्वसन , दहिगाव उपसा सिंचन योजना कामे व आवर्तने, वीज कपात व भारनियमन, रस्ते, आरोग्यकेंद्र, कुकडी आवर्तन, सीना कोळगाव प्रश्न आदि मुद्दे विधानसभा निवडणुकीत जसे प्रचारात आले तसेच याही निवडणूकीत प्रचारात असतील पण ज्या त्या भागात याचा परिणाम असणार आहे. यातील काही मुद्दे सर्वदुर परिणाम करतील. करमाळा तालूका हा गटातटाचा बाज असलेला तालूका असल्याने गटातील बेरीज व वजाबाकी यावरही प्रचारात काही सभांमधून चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.विद्यमान आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार नारायण (आबा) पाटील व बागल गटाच्या नेत्या रश्मी (दिदी) बागल यांच्या कामकाज पद्धतीवरही भाषणे होऊन कदाचित अनेक मुद्दे हाती असताना ही निवडणूक व्यक्तीपातळीवर जाऊ शकते. कदाचित म्हणूनच या निवडणूकीस मिनी विधानसभा निवडणूक म्हटले जाते.पक्षीय राजकारणाचा वा राज्य सरकारच्या कामकाज व निर्णयाचा मुद्दा प्रचारात येऊ शकेल. पण जर कोणत्या तरी राजकीय पक्षाचे बी फाॅर्म भरुन अधिकृतपणे जर उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असतील तर त्यांनाच राज्याच्या राजकीय स्थितीचा थोडाफार परिणाम होताना आढळेल. अन्यथा युत्या व आघाडीचे आणि निव्वळ गटबाजीचे राजकारण व उमेदवार रिंगणात असतील तर मात्र हि निवडणूक स्थानिक मुद्दयावर अधिक भर दिलेली असेल. अशारितीने वरील मुद्दे आगामी जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या निवडणूकीसाठी गाजणार हे जरी खरे असले तरी ज्या गटाकडे भक्कम प्रचार यंत्रणा, सोशल मेडीयाचे मोठे व दाट जाळे (नेटवर्क) आणि चांगल्या वक्तृत्व करणार्‍या मुलूख मैदानी तोफा (फर्डे वक्ते) असतील तोच गट मतदारांवर जादा परिणाम करु शकेल. - ✍सुनिल तळेकर - (राजकीय विश्लेषक)

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts