राज्याचे माजी मंत्री तथा शिवसेना नेते तानाजी सावंत यांनी नुकत्याच सोलापूर येथे आयोजित यूवासेनेच्या मेळाव्यात सध्याच्या वास्तवाला धरुन महाविकास आघाडीतील सहकारी पक्षावर आरोप करत हल्लाबोल केला. सध्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी पदभार सांभाळल्यानंतर राज्यातील तमाम शिवसैनिक खुप अपेक्षा बाळगून आहे. पण वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. राज्याचे अर्थ खाते राष्ट्रवादी काँग्रेसच्या कडे असल्याने तिजोरीतील सिंहाचा वाटा राष्ट्रवादी घेत आहे. पक्षवाढीसाठी त्यांचा हा प्रयोग यशस्वी होत असल्याचे नुकत्याच झालेल्या काही निवडणुक निकालावरुन समजते. सोलापुर जिल्ह्यावर पवार कुटूंबाचे विशेष लक्ष असून या जिल्ह्यातील पक्ष बळकटीसाठी राष्ट्रवादी सध्या राज्यातील सत्तेचा वापर करत आहे. यामुळेच मग माजी मंत्री तानाजी सावंत यांनी मांडलेली भुमिका ही समस्त शिवसैनिकांनी व्यक्त केलेली खदखद आहे. सत्ता असूनही खरा शिवसैनिक आज अडचणीत असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पालखीला खांदा देणारे मात्र हेलिकॉप्टर मध्ये बसून फेरी मारत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या अंतर्गत वादाचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसचे वा अपक्ष आमदार घेत आहेत.
शिवसेनेचा हा संक्रमणाचा कालावधी असून आता मात्र जिल्ह्यातील संघटनात्मक बदला शिवाय शिवसेना उभारी घेऊ शकणार नाही. तानाजी सावंत यांना मंत्रीपदाचे बळ देऊन दुसरीकडे शिवसेनेच्या व युवासेनेच्या पदाधिकारी निवडीत नवीन चेहरे आणले तरच आगामी जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा जिल्ह्यातील विविध गटात व गणात फडकलेला दिसेल. अन्यथा ये रे माझ्या मागल्या म्हणत तेच पदाधिकारी जर शिवसेनेची सुत्रे हाकणार असतील तर मात्र पक्षास फारसे चांगले दिवस येतील अशी आशा बाळगणे चुकीचे ठरेल. गेली अनेक वर्षं झाली पदावर तीच नावे ऐकुन आता युवकांनाही याचा वीट आला आहे. शिवाय अनेक वर्षे सेनेच्या पदावर राहील्याने आता जेष्ठ मंडळींच्या बोलण्यास वा कृतीस ती अस्सल शिवसेनेची धार राहीली नाही. या तलवारी आता बोथट झाल्याने नव्या दुधारी तलवारी म्याना बाहेर काढण्याची हिच खरी वेळ आहे.
शिवसेतील पदाधिकाऱ्यांचे अंतर्गत वाद आता झाकुन राहीले नाहीत. खर तर मुख्यमंत्री पदाचा वापर शिवसेनेच्या जिल्हा पातळीवर कार्यरत असलेल्या नेतेमंडळींनी जिल्ह्यात सर्वाधिक निधी खेचून आणून करायला हवा होता. कदाचित मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पर्यंत पोहचल्यास तिजोरीच्या चाव्या कोणाच्या हातात आहेत याला काही अर्थ उरला नसता. कारण राज्याच्या सर्वोच्च पदावर आज शिवसेनेचे नेतृत्व विराजमान आहेत. मुख्यमंत्री जे करतील तीच पूर्व दिशा होय. मग आता आपण कुठे कमी पडत आहे याचे चिंतन करावे लागणार आहे. कोकण, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातील शिवसेना बळकट होत असेल तर पश्चिम महाराष्ट्रात का नाही? यातही सांगली, कोल्हापूर व सातारा तसेच पुणे जिल्ह्यावर पक्ष नेतृत्व स्वतः जातीने लक्ष ठेऊन आहे. उरतो फक्त सोलापूर जिल्हा. यामुळे मग तानाजी सावंत यांनी पुनश्च एकदा राज्याच्या मंत्रीपदी वर्णी लागणे गरजेचे आहे. तसेच फार मोठे संघटनात्मक बदल होणे सुध्दा पक्षास उर्जा देणारे ठरेल. सध्या गावपातळीवरील शिवसैनिकास शाखा प्रमुख पदावर असताना वरीष्ठ पदाधिकाऱ्यांनी सत्तेचे बळ दिले पाहिजे. राज्याचा 25/15 चा निधी थेट देण्याचे अधिकार मंत्री महोदयास आहेत. या माध्यमातून मग ग्रामविकास निधीतून गावपातळीवरील कामे करुन पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. महानगरपालिका वा नगरपरिषदा यांना तर थेट निधी मिळतच असतो. पण जिथे शिवसेनेचा आमदार नसेल तिथे मात्र आता शिवसैनिकांनी सुचविण्यात आलेली लोकहीताची कामे तातडीने करुन ही पोकळी भरुन काढण्यासाठी काहीतरी वेगळे नियोजन होणे गरजेचे आहे. अन्यथा असेच दिवस पुढेही चालू राहिले तर मात्र अवघड होईल. शिवसेनेकडून या तीन वर्षात संपर्क अभियान म्हणून दोन उपक्रम राबविले गेले. राज्यात इतर जिल्ह्यात मोठ्या उत्साहात ही दोन्ही अभियाने तेथील सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राबवली व त्यास शिवसैनिक व नागरिक यांनी चांगला प्रतिसाद दिला. सोलापूर जिल्ह्यात मात्र ही दोन्ही अभियाने म्हणावी तेवढ्या ताकदीने राबवली गेलीच नाहीत. काही तालुक्यात तर कागदावरच हे अभियान राबवुन वरिष्ठांची दिशाभुल केली आहे.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे विचार तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी ही अभियाने राबविणे गरजेचे होते. यामुळेच मग आता नवी उर्जा नवी दिशा हवी. परत एकदा सोलापूर जिल्ह्यातील गावपातळीवर शिवसेनेच्या वाघाची डरकाळी घुमली पाहीजे. गावातील मंदीराबरोबरच गावच्या ग्रामपंचायत कार्यालयावरही शिवसेनेचा भगवा फडकलाच पाहीजे. आणि असं झालं तरच भविष्यात शिवसेनेची महाराष्ट्रात एकहाती सत्ता येऊ शकेल.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.