आज देशासह जगभरात कोरोनासारख्या महाभयंकर आजाराने थैमान घातले आहे.त्याचे दुष्परिणामही तसेच आहेत.अगदी दैनंदिन व्यवहार, नोकरी, व्यापार, उद्योगधंदे, शाळा ,कॉलेज, कंपन्या, इत्यादी सर्वच बंद आहे. मजुरांवर आर्थिक संकट बेरोजगारी आणि उपासमारीची वेळ आलेली आहे.प्रदीर्घ काळाच्या टाळे बंदीमुळे अशा अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.याला शेती क्षेत्रही अपवाद नाही. वास्तविक पाहता या साऱ्या समस्यांमध्ये "शेतकरी व शेती क्षेत्रावर"सर्वाधिक विपरीत परिणाम झालेला आहे. शेती व्यवसायावरच संपूर्ण मानवी जीवन अवलंबून आहे. कारण अन्न नसेल तर जगातील सातशे कोटी लोकसंख्या कशी जगेल?
म्हणजे "शेतकरी टिकेल तर शेत पिकेल" आणि "शेतकरी सुखी तर देश सुखी". प्रामाणिक पणा व कठोर परिश्रम ज्याची शान आहे ,तो माझ्या देशाचा शेतकरी आहे. "शेतकरी आहे अन्नदाता तोच हे देशाचा भाग्यविधाता ". परंतु आज या भाग्यविधात्याची कोरोनासारख्या महामारीमुळे अत्यंत बिकट अवस्था झालेली आहे.शेतकरी आणि शेतमजूर यांच्या पुढे तसेच शहरी व ग्रामीण जनतेपुढे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे वेगवेगळे प्रश्न आ -वासून उभे आहेत."खरा देश खेडयात राहतो" या उक्तीनुसार या संकटाचा, परिणामांचा वेध घेतला तर असे दिसते की, कष्टकरी, शेतकरी, शेतीपूरक उद्योग धंदे आणि सरकारी व्यवस्थेवर उभी राहिलेली ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडली आहे. दिवसभर राबून,घाम गाळून,आपल्या रक्ताचे पाणी करून, ऊन वारा पाऊस अंगावर झेलून गरिबीचे चटके झेलत, प्रसंगी उपाशी राहून ,डोक्यावर कर्जाचे मोठमोठे डोंगर असताना हा "जगाचा पोशिंदा" मात्र आयुष्यभर जगाचा "अन्नदाता"बनून आपल्या साऱ्यांसाठी कष्टात राहातो.
सतत निसर्गाच्या अवकृपेच्या छायेत असणारा बळीराजा कोरोनाच्या सुलतानी सोबतच वादळी पावसाच्या अस्मानी संकटाने हतबल झाला आहे.कुठे ओला दुष्काळ तर कुठे कोरडा दुष्काळ आणि कुठे अवकाळीचा तडाखा, कुठे महापूर तर आणखी कुठे गारपीट.अशा विविधांगी चित्रविचित्र समस्येमध्ये बिचारा शेतकरी सापडला.शेती पिकांच्या नुकसान बरोबरच घरदारं उध्वस्त झाली, गुरेढोरे मेली.त्यातच काही ठिकाणी टोळधाडीचा प्रश्न निर्माण झाला होता.पिकांचं नुकसान झालं, कसंतरी थोडं फार हाती आलं त्याला योग्य भाव मिळाला नाही .अशा एकाहून एक महाभयंकर संकटाने शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले होते .परंतु याही काळात शेतकरी मोठ्या धैर्याने तोंड देत होता. परंतु शेतकरी पूर्णपणे चिंताग्रस्त झाला तो कोरोनाची संचारबंदी आणि टाळेबंदी यामुळेच. या आजारापुढे आणि सरकारच्या निर्णयापुढे शेतकरी अगदी हतबल झाला होता. कारण हिरवीगर्द झाडी ,पाटाचे पाणी, आणि वाऱ्याच्या तालावर डोलणारे गहू, ज्वारी, ऊस, मक्याची पिके जागोजागी खळे-दळे असे सर्व व्यवस्थित चालू असतानाच या पिकांच्या माध्यमातून स्वप्न प्रत्यक्षात यायच्या आताच नेमकी कोरोनाची महामारी आपल्यापर्यंत आली. मोठे संकट आ -वासुन उभे राहिले. सारे जग टाळेबंदीत अडकले .सर्व व्यवहार ठप्प झाले. याच काळात हमखास उत्पन्न देणारा रब्बी हंगाम पूर्ण होऊन सुगीचे दिवस आले होते.कोरोनाच्या भीतीमुळे झालेले स्थलांतर, आलेले निर्बंध, यामुळे पिकांची कापणी ,काढणी, मळणी, प्रतवारी आणि वाहतूक यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध झाले नाही.किंवा त्यासाठी लागणारी यंत्रे व चालक देखील मिळाले नाहीत .वाहतूक व्यवस्थेचे संकट ,व्यापारीवर्गाची माल खरेदीची अनास्था ,प्रतिकूल वातावरणामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळलं. वर्षभर काबाडकष्ट आणि प्रचंड भांडवली खर्च करून पिकवलेला माल वाया गेल्यामुळे आणि कोरोनाच्या व पावसाच्या धास्तीमुळे कुठे कुठे तर गारपीट झाल्यामुळे शेतकरी पूर्णपणे खचून गेला आणि अधिकाधिक चिंताग्रस्त झाला. टरबूज,खरबूज, ऊस, केळी, द्राक्षे, आंबे ,डाळिंब, संत्री, मोसंबी, पपई इ.उन्हाळी हंगामातील पिकांची, फळांची तीच अवस्था झाली .नेमका माल भरपूर आला पण बाजारपेठा बंद वाहनं उपलब्ध नाहीत त्यामुळे तयार झालेला माल शेतातच पडून कुजून गेला; तर काही शेतकऱ्यांनी फळे भाजीपाला जनावरांना खाऊ घातला; कोणी कोणी तर बांधावर फेकून दिला.तसेच काहींनी तर चक्क पिकांवर नांगर फिरवला.अतोनात कष्ट करून ,मेहनत घेऊन चांगला पिकलेला माल मातीमोल झालेले पाहून माझ्या शेतकरी बांधवांना अश्रू अनावर झाले. अगदी थोड्याच बांधवांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून स्वतःच्या वाहनांमध्ये माल शहरात आणून मिळेल तेवढ्या पैशात विकून किंवा फुकट वाटून संपवला. कांदे ,बटाटे, टोमँटो ,फळभाज्या ,पालेभाज्या यांचाही चांगल्या मागणीच्या काळ हाच होता; परंतु संचारबंदी आणि टाळे बंदीमुळे सर्व हॉटेल्स खानावळी लग्न समारंभ इत्यादी कार्यक्रम बंदीमुळे आणि किरकोळ विक्रीवर देखील बंधने असल्यामुळे माल पडून नुकसान झाले.असलेल्या मालाला भाव कमी मिळाले.व्यापारी कवडीमोल भावाने शेतकर्यांकडून माल घेऊन चढ्या भावाने बाजारात विकतात.त्यामुळे शेतकर्यांच्या नुकसानी बरोबरच बदनामी देखील होते.या गोष्टीची शेतकऱ्यांना खूप खंत वाटते . शेतकर्यांचे एटीएम असलेला दूध व्यावसाय, मिठाई व्यवसाय,प्रक्रिया उद्योग, किरकोळ विक्री हे सुद्धा अडचणीत आले. तूर, हरभरा, गहू ,मका, कापूस अशा पिकांची शासकीय खरेदी केंद्रे बंद असल्याने उत्पादित माल साठवण करण्यास व्यवस्था ,- जागा उपलब्ध नसल्याने शेतकरी विवंचनेत आहे. फळांचा राजा असलेल्या आंब्यावर सुद्धा कोरोनामुळे संक्रांत आली.संचारबंदी व जागोजागी नाकाबंदी ,मजुरांची टंचाई पॅकिंग साहित्याची कमतरता ,आणि मुळातच मागणी कमी होती.परंतु त्यात देखील शेतकर्यांपासून ग्राहकांपर्यंत माल पोहचवण्यात अनेक अडचणी आल्या . द्राक्ष उत्पादकांची सुद्धा अशीच अडचण झाली.आयात निर्यातीवर निर्बंध असल्यामुळे त्यांनी सुद्धा द्राक्षबागांवर नांगर फिरवले; आणि ज्यामुळे कोटय़ावधीचा फटका बसला. शेतीसोबतच जोडधंदा म्हणून काही शेतकरी कुकुट पालन व्यवसाय करतात.ते देखील या कोरोनामुळे आर्थिक अडचणीत आले.त्यांचा झालेला खर्च सुद्धा त्यांना मिळाला नाही .या व्यवसायावर होणारा खर्च परवडण्यासारखा नाही.मालाचे खूप नुकसान झाले त्यात भरीसभर कोंबड्या मरणे त्यांची विल्हेवाट लावणे हे ही प्रश्न होते .शिवाय कोरोनाच्या भीतीमुळे चिकन खायला लोक तयार नव्हते फुकट सुद्धा कोणी घेऊन जात नव्हते. लाखो कोंबड्यांचा प्रश्न शेतकऱ्यांपुढे होता या सर्व अडचणीमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले त्याला रात्रभर झोप सुद्धा लागली नाही . तीच अवस्था फुल शेती करणार्यांची झाली.मोठ्या बाजारपेठा बंद असल्याने माल जागेवरच सडला. संपूर्ण फुलशेती कोमेजून गेली.मंदिर ,चर्च, प्रार्थनास्थळे बंद असल्यामुळे तसेच लग्न वाढदिवस असे छोटेमोठे कार्यक्रम बंद असल्यामुळे फुल व्यवसाय करणार्यांना मोठा धोका झाला. म्हणजे काय तर बाजारपेठ उघडेना, मजूर मिळेना, व्यापारी माल घेईना अशा तिहेरी संकटात बळीराजा अडकला. एकूणच काय तर , ओला दुष्काळ, सुका दुष्काळ ,टोळधाड,सावकाराचा त्रास ,भ्रष्टाचार, राजकीय वाद, फसवणूक, खोटी आश्वासनं, आर्थिक पारतंत्र्य, छळवणूक आणि (आताची टाळेबंदी व संचारबंदी )यात कायमच शेतकरी होरपळून निघतोय. या सार्या वैतागामुळे शेतकरी तर म्हणू लागले, "आम्ही कोरोनाने नाही तर सरकारच्या धोरणाने मरू". "सरकारने शेती व शेती माल संबंधित सेवा आणि व्यापाऱ्याला चौकटीच्या बाहेर काढून सेवा सवलती दिल्या पाहिजेत." जाता जाता. . सांगावेसे वाटते; "राबणाऱ्या हातांना नेहमीच गृहित धरून कसे हो जमेल जगाचा पोशिंदा नका तिष्ठवू शेतकरी जगेल तर देश जगेल . श्रीमती सुलभा खुळे देशमुख (करमाळा) सोलापूर .
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.