गेले अनेक दिवस चर्चेत असलेल्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या भाडेपट्टी कराराबाबत काल प्रथमच प्रत्यक्ष सभासदांचे मत ऑनलाईन सभेच्या माध्यमातून का होईना पण जाणून घेतले गेले. आमदार रोहीत पवार यांनी हा भाडेपट्टी करार एक व्यावसायिक या भुमिकेतून केला.पण हा करार रद्द करायला मात्र करमाळा तालुक्यातील राजकारण जोमाने पुढे आले. नेहमीच गटातटाचे राजकारण खोलवर रुजलेला हा करमाळा तालूका मोठमोठ्या नेत्यांनाही खरा समजला नसल्याने अगदी नवख्या नेतृत्वांना समजण्यास थोडा अवधी लागणारच आहे. कालच्या बैठकीत केवळ 368 सभासद सहभागी होतात यातच फार मोठे रहस्य दडलेले आहे. एकीकडे कारखाना चालू झाला पाहिजे असे म्हणणारे खुप होते.पण प्रत्यक्ष बैठकीत सहभागी होणारे कमी होते. आदिनाथच्या सभासदांची हि मानसिकता आहे. यामुळेच मग राजकारणास ऊत येतो. प्रसिध्दी माध्यमातून मोठे काॅलम भरुन बातम्या आल्या पण तेवढा प्रतिसाद मात्र सभासदांनी दिला नाही.एकुणच काय तर गेले काही दिवस चाललेले हे आदिनाथ पुराण सभासदांनी मात्र करमणुकीचा विषय समजून गुंडाळून ठेवले.
बचाव समितीची विश्वासार्हता कमी असल्याने सभासदांनी त्यांचे म्हणणे फारसे गांभीर्याने घेतले नाही का हा सुद्धा मुद्दा यानिमित्ताने उपस्थित होवु शकतो . शेवटी शेवटी तर बचाव हि जणू विद्यमान संचालक मंडळाची बी टिम आहे काय अशी शंका काही सभासदांनी बोलूनही दाखविली. पंढरपुरच्या विठ्ठल कारखान्याचाही ऑनलाईन सभेचा प्रस्ताव तेथील विरोधक हाणून पाडण्यासाठी प्रयत्न करत होते. पण इथे आदिनाथ बाबत मात्र जाब विचारणारे आणि जबाब देणारे दोघेही ऑनलाईन सभेवर सहमत झाले.ऑफलाईन सभा झाली असती तर मात्र कदाचित विचार मंथन, वाद प्रतिवाद होऊन काहीतरी चांगले निर्णय हाती मिळाले असते. खर तर भाडेपट्टी करार रद्द होण्याचा ठराव हा काही वाईट निर्णय आहे असे म्हणता येणार नाही. पण या ठरावास 32 हजार सभासदांपैकी 51 टक्के सभासदांचे पाठबळ असते तर मात्र नक्कीच आदिनाथ चालवणारास एक प्रकारचे आत्मबळ मिळाले असते.जणू मुडदुस झालेले बाळ असावे असा हा 368 सभासदांचा पाठींबा असलेला ठराव खरच भाडेपट्टी करार रद्द करण्यासाठी महत्वाची भुमिका निभावणार का हे पाहायला अजून थोडा अवधी असेल. आदिनाथच्या भाडे करार रद्द बाबतच्या नाटकाचा आता कुठे पहिला अंक संपला आहे. कदाचित दुसऱ्या अंकात काही मात्तबर नेत्यांचे प्रवेश होतील असा अंदाज वर्तवला तर खोटा ठरणार नाही.
रश्मी बागल यांचा अपवाद वगळता तालुक्यातील इतर दोन्ही बडे नेते आदिनाथच्या लाईमलाईट मधे आलेच नाही. आता पुढे मात्र चित्र वेगळे असणार आहे.कारण आता बचावची जबाबदारी संपली आहे ,का वाढली आहे भविष्यात ठरेल. इथुन पुढचे नाटक आदिनाथचे खरे भवितव्य ठरवणारे असेल. समजा भाडेपट्टी करार रद्द झाला व कारखाना तालुक्यातील नेतेमंडळींनच चालवायचे असे ठरले तर हे आवाहन कोणाला पेलणार? राज्य सहकारी बॅकेचे कर्ज फेडले तर नवीन भागभांडवल कसे उभे करणार? बर एवढे सारे होऊनही कारखाना सुरुच झाला तर गाळप किती होणार?कामगार ,वाहतूकदार यांची सर्व देणी चुकती कशी होणार हे सगळे प्रश्न साखळी धरुन उभे आहेत. कोरी पाटी असलेले व जनाधार असलेले 22 कार्यकर्ते शोधूनही सापडणार नाहीत. यामुळेच मग आदिनाथ मधील राजकारण असेच पुढे चालू राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे.रश्मी बागल यांनी मात्र आदिनाथ कारखाना सुरु व्हावा यासाठी जे काही करावे लागेल त्या सकारात्मक बाबी केल्याने आता त्यांच्या वर आदिनाथ बंद का पडला याचे खापर फोडण्याचे अधिकार कुणाला उरले नाहीत. इथुन पुढे मात्र ताकही फुंकून पिण्याची बागल गटाची भुमिका राहील. यामुळेच मग आता आदिनाथच्या भुतकाळाबद्दल जादा न बोलता भविष्य काळातील सुनियोजनाच्या गोष्टींचा विचार सभासदांनी केला पाहीजे. आदिनाथ सुरु झाला तरी आदिनाथला ऊस न घालणारे सध्या जास्त ॲक्टीव्ह असल्याचे दिसून येत आहे तर आदिनाथला ऊस घालणारा खरा सभासद अजूनही काठावर बसुन या सगळ्या गोष्टी पहात आहे. आदिनाथ सुरु झाला तर तो तालुक्यातील इतर कारखान्यांचा प्रतिस्पर्धी असणार आहे. यामुळेच मग "आ बैल मुझे मार" अशी गत काही नेत्यांची होणार हे मात्र खरे आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.