loader
Breaking News
Breaking News
Foto

करमाळ्याचे राजकारण लय भारी, सहकाराला मारी अन् आमदारांना तारी!

करमाळा तालुक्यात सध्या सगळीकडे ताळमेळ नसलेल्या व विसंगत अशा राजकीय घटना घडत आहेत. मागील आठवड्यातील बुधवार हा संपूर्ण दिवस घडामोडीचा असाच होता. करमाळा पोलीसांवरील ताण वाढावा अशा घटना तालुक्यातील विविध भागात घडल्या. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची " राष्ट्रवादी परिसंवाद यात्रा" आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नामदार जयंत पाटील हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहीले. राज्यातील एक अभ्यासू मंत्री व मात्तबर नेते यांच्या नजरेतून संयोजकांची एक मोठी चुक सुटली नाही. चक्क या कार्यक्रमाला जणु काही विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीचे स्वरुप देण्याचा संयोजकांनी घाट घातला असावा की काय अशी शंका मंत्री महोदयांनी बरोबर हेरली पण फारसे न बोलता सहज पणे ही चुक उपस्थितांसह सर्वांच्या लक्षात आणून दिली.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

करमाळा शहर त्यामानाने फार मोठे नाही. त्यामुळे टिव्ही चॅनलचे प्रतिनिधी या कार्यक्रमाला हजर नव्हते अन्यथा हा कार्यक्रम जर पुणे, मुंबई, नाशिक वा नागपुर औरंगाबाद येथे असता तर मात्र राज्यात लवकरच राष्ट्रपती राजवट लागू होणार असून त्यानंतर मध्यावधी निवडणुका लागणार ? हे मथळे ब्रेकींग न्युज म्हणून दिवसभर चर्चेत राहीले असते. कदाचित पवार साहेब यांना मध्यावधी निवडणुका होणार असल्याचे संकेत मिळाल्यानेच परिसंवाद यात्रेचे रुपांतर राष्ट्रवादी पक्षाने विधानसभा निवडणुक पुर्वतयारी मध्ये केले असा विषय झाला असता. तसे पाहिले तर हा विषय फार मोठे महत्त्व देण्यासारखा नाही परंतू अपक्ष आमदार संजयमामा शिंदे हे या कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक असल्याने चर्चा तर होणारच.या कार्यक्रमात आगामी जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या निवडणुकीचे नेतृत्व माजी आमदार जयवंतराव जगताप यांना देण्याची आमदार शिंदे गटाची मानसिकता दिसुन येत होती. निवडणुकीपूर्वीच आमदार शिंदे यांचे बॅकफूटवर जाणे शिंदे गटातील किती कार्यकर्त्यांना आवडले हा एक चर्चेचा व संशोधनाचा विषय आहे. आमदार संजयमामाची हि खेळी माजी आमदार जयवंतराव जगताप गटाचा उत्साह वाढवणारी असली तरी स्वतःच्या गटात अशांतता निर्माण करणारी आहे. आगामी काळात जगताप गट जागा वाटपावरून आक्रमक भूमिका घेणार. यामुळे मग शिंदे गटातील काही जणांचे सभापती पदाचे स्वप्न विरुन गेलेले असणार. परंतू करमाळा तालुक्यातील राजकारण हे गटातटावर अवलंबून असते हे खूलेआम सांगताना आमदार संजयमामा यांच्या बेधडकपणाचे कौतूकही करणे महत्वाचे वाटते. आमदार संजयमामा यांनी करमाळा तालुक्यातील राजकारणाचे पायंडे व डावपेच सात वर्षात आत्मसात केले असल्याचे आता त्यांच्या बोलण्यातून जाणवते.

बेधडक ✍ शंभुराजे

दुसरीकडे आदिनाथ भाडेतत्त्वावर चालविण्याच्या करारास हाणून पाडण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करमाळा येथील दत्त मंदिरात याच दिवशी केले होते. वास्तविक पाहता या बैठकीस आमदार संजयमामा शिंदे गटातील काही पहिल्या फळीतील नेतेमंडळींनीच हवा दिली होती. यामुळे नेमके बैठकीत काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. परंतू परत एकदा आमदार संजयमामा व गट संघटक तानाजी झोळ यांनी मोठ्या कौशल्याने या बैठकीपासून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना दुर ठेवले. वास्तविक पाहता या बैठकीस तगडे नेतृत्व अथवा आवाहन करणारा तगडा नेता न मिळाल्याने हि बैठक अयशस्वी होणार याची शंका आली होती. परंतू यंदा तालुक्यातील अतिरिक्त ऊसाचा प्रश्न ऐरणीवर असताना ऊस उत्पादक शेतकरी आपसुक या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित राहतील असा अंदाज सर्व राजकीय मंडळींना वाटत होता. पण आदिनाथच्या अधोगतीस दुसरे कोणी नाही तर सभासदच कारणीभुत आहे हे परत एकदा सभासदांनी गैरहजर राहून दाखवून दिले.ज्यांच्यासाठी हि बैठक आयोजित केली त्या घटकानेच आयोजकांना तोंडावर पाडले असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.या दोन घटना घडत असताना जेऊर महावितरण कार्यालया समोर शेतकऱ्यांनी गोंधळ घातला. वीज कनेक्शन तोड मोहिमेच्या विरोधात विना परवाना आंदोलन करत सोशल मेडियाद्वारे तालूक्याचे लक्ष वेधून घेतले. खर तर परिस्थिती हाताबाहेर गेली असती परंतू पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांनी अतिशय हुशारीने हे आंदोलन हाताळले व कोणताही अनुचित प्रकार घडू दिला नाही. परंतू इकडे या आंदोलनाची दखल राष्ट्रवादी बैठकीत उपस्थित असलेल्या नेतेमंडळींना घ्यावी लागली व तेथे नामदार जयंत पाटील यांना वीजजोड थांबवून पुरेशी वीज शेतकऱ्यांना द्यावी अशा मागणीचे निवेदन माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या हस्ते देण्यात आले. इथेही आमदार संजयमामा यांनी सावध भुमिका घेत स्वतः मागे राहणे पसंद केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत तेथून 17 किमी दुर घडलेल्या वीज आंदोलनाचे पडसाद उमटतात काय, त्याची दखल नेतेमंडळी घेतात काय व निवेदनही लगेच देतात काय, हि साखळी बरेच काही सांगून जाते. परंतू राष्ट्रवादीच्या बैठकीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या दत्त मंदिरातील आदिनाथ बचावच्या बैठकीचा विषय सुध्दा काढला जात नाही याचेही आश्चर्य वाटते.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

करमाळा तालुक्यातील महत्त्वाचे प्रश्न लोकचर्चेत असतानाही माजी आमदार नारायण पाटील व बागल गटाच्या नेत्या रश्मीदिदी बागल यांनी मात्र या सर्व घटनांपासून अलिप्त राहणे पसंद केले. कदाचित त्यांचे हे धोरण कितपत योग्य होते याचे उत्तर मिळण्यास आता निवडणूकीची वाट पाहवी लागेल. करमाळा तालुक्यातील सर्वच पत्रकारांनी मात्र सर्व घटनांना समान न्याय देत दिवसभर लोकांसमोर आपल्या बातम्या मधून वास्तव मांडले ही लोकशाही बळकट करणारी बाब आहे. पण करमाळा तालुक्यातील आदिनाथ कारखान्याचा सभासद मात्र पाणी नाकातोंडाशी आले तरी काहीच हालचाल करत नाही हे लक्षण सहकारास जिवंत ठेवणारे नाही असे बेधडकपणे म्हणावे लागेल.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts