शेतकऱ्यांचे व सभासदांचे मंदिर म्हणून ओळखला जाणारा आदिनाथ सहकारी साखर कारखाना एकेकाळी उसाच्या कोठारात असलेला कारखाना, वजन काट्यावर एक नंबर असलेला कारखाना, दर देण्यात एक नंबर असलेला कारखाना ,रिकव्हरी व गाळपामध्ये एक नंबर असलेला कारखाना म्हणून ओळखला जात होता.सध्या हा कराखाना ऊसदर, गाळप वा रिकव्हरी मुळे चर्चेत नाही आला तर अनेक वर्षांपासून बंद असल्याने आता भाडेपट्टी करारा वरुन चर्चेत आला आहे.
सत्ताधारी बागल गटास आदिनाथ हा 'वरदान' म्हणून फलदायी ठरण्यापेक्षा 'शाप' म्हणूनच तोट्याचा ठरला आहे.आदिनाथचा भाडेपट्टी करार आमदार रोहीत पवार यांच्या बरोबर झाला असे काही महिन्यांपूर्वी छातीठोकपणे सांगू पाहणाऱ्या बागलांना आता कराराची प्रक्रिया अजून चालू असल्याचे स्पष्ट करावे लागले. नेमकं यामागचे गौडबंगाल आहे तरी काय? आदिनाथ कारखान्यावर आजवर बहुतांश काळ हा बागलांची सत्ता असलेलाच होता. या दरम्यान बागल नेतृत्वांनी आपल्या कार्यकर्त्यांना तर कधी सहकारी गटांना आदिनाथचा कारभार पहायची संधी दिली. यात मग अनेक मंडळींचा समावेश आहे. बागल नेतृत्वाखाली आदिनाथचा कारभार पहायला मिळालेले आप्पासाहेब झांजुर्णे, चंद्रकांत सरडे, वामन बदे हि मंडळी आज बागल गटावर खापर फोडून विरोधी गोटात जाऊन बसली आहेत. तर दुसरीकडे महेश चिवटे व विवेक येवले या पत्रकारांचे लेखणी कौशल्य पाहून बागल नेतृत्वाने यांनाही एकेकाळी मकाईचे संचालकपद देऊ केले होते. आज ह्याच लेखण्या बागलां विरोधात तलवारी प्रमाणे तळपत आहेत .तो भाग वेगळा. वास्तविक पाहता आदिनाथच्या दुरावस्थेचे खापर बागल नेतृत्वावरच फुटणे हे काही अन्यायकारक नाही.' तळे राखील तो पाणी चाखील 'असे म्हणत आदिनाथच्या चांगल्या काळात वरील सर्व मंडळींनी हात धुऊन घेतले. बागल नेतृत्वाने सत्तेचा भोग इतरांपेक्षा जास्त घेतला एवढंच. (याबाबत आदिनाथ च्या आधोगतीस जबाबदार असलेल्या कारणावर करमाळा चौफेर मधुन जवळपास पाच भागांमध्ये आम्ही संपादकीय लेख लिहले होते.असो..) यामुळे मग गेले एक दशक उलटले आदिनाथ कारखाना बागल गटास राजकीय दृष्ट्या तोट्याचा ठरत आला आहे. विधानसभेतील दोन पराभव, पंचायत समितीची हातुन गेलेली सत्ता, महत्वाची पदे भोगूनही गट सोडून गेलेले वामनदादा बदे, तात्यासाहेब मस्कर, चंद्रहास निमगिरे, विलास पाटील (घोटी व झरे) तानाजीबापु झोळ, नवनाथ झोळ यासह अनेक कार्यकर्ते, वरिष्ठ नेतृत्वांनी सोडलेली पाठ, आदिमुळे बागल गट खचून जात होता. आणि यास प्रमुख कारण होते ते केवळ आदिनाथ कारखान्याची सत्ता एवढेच होय. यामुळे मग आदिनाथ भाडेतत्त्वावर देण्यासाठी बागल गटाने साखर आयुक्तांच्या कार्यालयात हेलपाटे मारण्यास सुरुवात केली. शिकार आयतीच चालून येत आहे हे पाहून पवारांनी हि संधी सोडली नाही.रोहीत पवारांना समोर करत आदिनाथच्या भाडेकराराचे टेंडर भरले. यावेळी असे म्हटले जाते की आमदार बबनदादा शिंदे यांनी सुध्दा टेंडर भरले होते. बर ही सर्व प्रक्रीया सुरळीत झाली असताना आज अचानक या सर्व प्रकरणाला वेगळेच वळण लागले. पवारांना आदिनाथ भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी काही अडचणी आल्या असतील का? सहकारातील सर्वात मात्तबर नेतृत्वानेच आदिनाथ बाबत एवढा यु टर्न का घेतला? हे प्रश्न फार महत्त्वाचे आहेत.आदिनाथची स्थावर मालमत्ता व शिल्लक असलेली साखर हेच अडसरीचे खरे कारण ठरले का?
राज्यात सध्या विरोधी पक्षात असलेल्या भाजपाने सत्ताधारी मंडळीमागे इडीचा ससेमिरा लावला आहे. राष्ट्रवादी च्या नेत्यांनी चालवण्यास घेतलेल्या राज्यातील २१ कारखान्यांची इडी कडुन चौकशी सुरु आहे. किरीट सोमय्या हे अनेक नवीन प्रकरणे रोजच बाहेर काढत आहेत. पवार कुटुंब व पवारांच्या नातेवाईकांच्या घरावर देखील धाडसत्र सुरु झाले होते. व सध्या महाविकास आघाडी व केंद्र सरकार वाद विकोपास गेलेला आहे.अशा परिस्थितीतीमध्ये उगीच हाताने संकट ओढून घ्यायला नको म्हणून पवारांनीच आदिनाथकडे पाठ फिरवली असेल का? आणि मग असे जर झाले असेल तर करमाळा तालुक्यातील सभासदांचा पवार कुटुंबावरील उरला सुरला विश्वास संपुन जाऊ नये म्हणून आदिनाथचे हे भीजत घोंगडे परत एकदा सभासदांच्याच खांद्यावर टाकण्याचा तर हा सर्व डाव नसेल का? बागलांनी त्यांची जबाबदारी पार पाडली, आणि आम्ही तर आदिनाथ चालू व्हावा म्हणून खुप प्रयत्न केले हे सांगण्यास आता बागल गट सारखाच प्रयत्न करणार. तर दुसरीकडे विद्यमान आमदारांचा दिल्ली दौरा झाल्यानंतर आदिनाथच्या प्रकरणाला हवा मिळणे हा काही योगायोग नव्हे. काही स्थानिक पत्रकारास सोशेल मिडिया हाती धरुन हव्या तशा बातम्या पेरुन वातावरण निर्मिती करण्यात आली आहे. पवारांचे समर्थक असलेल्या शिंदे गटातील कार्यकर्तेच आज आदिनाथ वाचवा म्हणून सभासदांना हाका देत आहेत. हा सगळा काय प्रकार आहे हे न कळण्याइतपत आदिनाथचा सभासद खुळा नाही. बागल, पवार, शिंदे या कुणालाही आदिनाथ बद्दल आस्था नसुन या मंडळींना केवळ राजकारण करावयाचे आहे हे सभासदांच्या लक्षात आले आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांच्या सहकार्याने हा कारखाना उभारला व ज्यांच्या वडिलांचा म्हणजे सहकार महर्षी स्व शंकरराव मोहिते-पाटील यांचा पुतळा ज्या कारखान्यावर आहे.ज्यांचे कृपेने तालुक्यातील अनेकजण संचालक चेअरमन झाले ते मोहिते-पाटील कुटुंबीय देखील केंद्रात सत्ता असताना आदिनाथ बद्दल अमित शहा ची भेट घेऊन मदत मिळवण्यासाठी पुढाकार घेताना दिसत नाहीत त्यांनी आवसायनात निघलेला शंकरराव कारखाना सुरु केला मग आदिनाथ बाबत दुजाभाव का ? हा सुद्धा म्हतवाचा प्रश्न आहे. तसेच स्व गोविंदबापू पाटील यांचे आदिनाथ उभारणी चे योगदान व कष्ट संपूर्ण महाराष्ट्रात माहिती आहे.त्यांचे पुत्र नारायण पाटील शिवसेनेचे माजी आमदार आहेत. राज्यात सेनेचा मुख्यमंत्री आहे मात्र पाटलांची देखील भुमिका गुलदस्त्यात आहे.तसेच माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी देखील आदिनाथ चा कारभार पाहिलेला आहे."संगोबाच्या आदिनाथ वर जेवढी श्रद्धा जयवंतरावांची आहे तेवढीच भाळवणी - शेलगावच्या आदिनाथ वर देखील आहे "मग ते देखील गप्प का आहेत? एकंदरीत मोहिते-पाटील नारायण पाटील व जयवंतराव जगताप यांचे आदिनाथ बाबत चे मौन का आहे? यांची पवारांच्या कराराला मुकसंमती आहे का? असे अनेक प्रश्न सभासदांच्या मनात आहेत. आदिनाथ च्या करारावरुन सुरु झालेले वादळ पहाता एक गोष्ट मात्र नक्कीच समोर येते ति म्हणजे आदिनाथ च्या उभारणी अगोदरही खुप पंचवार्षिक निवडणूका झाल्या, आणि आता आदिनाथ बंद पडला असतानाही खुप निवडणूका होत राहणार एवढेच काय ते यातून स्पष्ट होत आहे. पदांचा वापर करत आदिनाथसाठी आर्थिक मदत मिळवून आदिनाथला गतवैभव प्राप्त झाले पाहीजे म्हणून प्रामाणिकपणे प्रयत्न करताना आजी माजी लोकप्रतिनिधी दिसुन येत नाहीत.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.